"पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची 'त्यांची' जिद्द बघता कौतुकही करावंसं वाटतं"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 01:45 PM2021-03-24T13:45:16+5:302021-03-24T13:48:21+5:30

Rohit Pawar on Devendra Fadnavis : रोहित पवार यांचा फडणवीसांना टोला. मंगळवारी फडणवीसांनी घेतली होती केंद्रीय गृह सचिवांची भेट

ncp leader rohit pawar slams former chief minister devendra fadnavis over meeting dlhi home ministry maharashtra issues social media facebook | "पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची 'त्यांची' जिद्द बघता कौतुकही करावंसं वाटतं"

"पुन्हा येण्यात अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची 'त्यांची' जिद्द बघता कौतुकही करावंसं वाटतं"

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी फडणवीसांनी घेतली होती केंद्रीय गृह सचिवांची भेटविरोधी पक्षनेते दिल्ली जाऊन आले तरी त्यांचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत हे सत्य, पवार यांचं वक्तव्य

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. "मी माझ्या जवळीस सर्व पुरावे एका बंद लिफाफ्यात केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत आणि या प्रकरणासंदर्भात माझ्याकडे असलेली सर्व माहिती मी त्यांना सांगितली आहे. त्यासोबतच याची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना दिली. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावरून फडणवीसांवर निशाणा साधला. 'पुन्हा येण्यात' अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता त्यांचं कौतुकही करावंसं वाटतं, असं म्हणत पवार यांनी फडणवीसांना टोलाही लगावला. NCP Leader Rohit Pawar slams former chief minister Devendra Fadnavis 

"राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात तक्रार करण्यासाठी 'भाजप'चे विरोधी पक्ष नेते दिल्लीला जाऊन आले. 'विरोधी पक्षनेते' म्हणून त्यांनी निश्चित काम करावं, पण राज्याच्या हिताचा विषय येतो तेंव्हा राज्याची बाजू घेण्याचंही विरोधी पक्षनेत्याचं कर्तव्य आहे, हेही त्यांनी विसरायला नको. माझ्या माहितीनुसार अत्यंत महत्वाचे आणि राज्याच्या हिताचे किमान ३१ विषय केंद्राकडे आज प्रलंबित असून हे विषय मार्गी लागणं अत्यंत महत्वाचं आहे," असं पवार यावेळी म्हणाले.

राज्यातील निवडक खासदार या प्रश्नांसाठी प्रयत्न करत असतातच, पण बहुतांश खासदार कशासाठी लोकसभेत आवाज उठवतात हे विरोधी पक्ष नेत्यांनीही गेल्या दोन तीन दिवसात अनुभवले असेलच. राज्य सरकार तर केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करतच असतं. विरोधीपक्ष नेते दिल्लीत जाताच केंद्रीय कायदा मंत्र्यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र सरकारवर आगपाखड केली. सुशांतसिंग प्रकरणात ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारवर दिवसरात्र आरोप करत आपल्या राज्याला बदनाम करण्याचा हिंदी माध्यमानं प्रयत्न केला होता, त्याचप्रमाणे कालही हिंदी माध्यमातून राज्यावर आरोप करणं सुरु आहे. संविधानाला बगल देऊन दिल्ली सुधारणा कायद्याचं विधेयक पारित होऊन दिल्ली सरकारचे हक्क सीमित करण्याचा विषय असो किंवा बिहार विधानसभेत आमदारांना झालेली मारहाण हे महत्वपूर्ण विषय हे हिंदी माध्यमांसमोर दुर्लक्षित विषय आहेत. या सर्व बाबी बघता राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांचं दिल्लीत चांगलं वजन असल्याचं दिसतं. दिल्लीला गेले म्हणल्यावर आणि दिल्लीत एवढं वजन असल्यावर राज्याचे प्रलंबित प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी निश्चितच केंद्र सरकारकडे मांडले असतील अशी आशा करूयात, असंही ते म्हणाले. 



मुंबईचं महत्त्व कमी केलं

"गेल्या पाच वर्षात मुंबईचं आर्थिक महत्व कमी केल्याचं आपण पाहिलं. यात IFSC चा विषय सर्वात महत्त्वाचा होता. IFSC सेंटरवर मुंबईचा असलेला नैसर्गिक हक्क डावलून ते दुसऱ्या राज्याला भेट दिलं. आज हे सेंटर मुंबईत असतं तर राज्यातल्या तरुणांना रोजगार तर मिळालेच असते, त्यासोबतच राज्याला मोठ्या प्रमाणात हक्काचा महसूलही प्राप्त झाला असता. मुंबईत IFSC सेंटर होणं हे केवळ महाराष्ट्राच्याच नाहीतर संपूर्ण देशाच्या हिताचं आहे, त्यामुळं विरोधी पक्ष नेत्यांनी हे सर्व आर्थिक विषय दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मांडले असतील अशी आशा करुया," असंही त्यांनी नमूद केलं. 
"गेल्या पाच वर्षात एनएसजी केंद्र आणि मरीन पोलिस अकादमी मुंबई वरून गुजरातला गेली, नागपुरची खनिकर्म संशोधन संस्थाही गुजरातला गेली याबद्दलही विरोधीपक्ष नेत्यांनी केद्राला जाब विचारलाच असेल. राज्यांचे हक्क मर्यादित करणारे प्रस्तावित वीज सुधारणा विधेयक, नद्या संदर्भातील तिन्ही विधेयके तसेच दिल्लीत सीमेवर आंदोलनाला बसलेले लाखो शेतकरी याविषयीही विरोधी पक्ष नेत्यांनी चर्चा केलीच असेल," असंही पवार म्हणाले.  

"निराधार आरोपातील हवा निघून गेल्यानंतर नवीन काहीतरी आरोप करायचे हा राज्यातील विरोधी पक्षाचा नेहमीचा खेळ आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला अशी काही हवा दिली गेली की, यातून खूप मोठं खळबळजनक काहीतरी बाहेर येईल असं लोकांना वाटायचं. याच मुद्द्यावर भाजपने बिहारची विधानसभा निवडणूकही लढवली, परंतु सत्य हे कधी झाकत नसतं. तसाच एक प्रयत्न त्यांनी आताही सुरू केला आहे. सत्तेच्या बाहेर असणं त्यांना बिलकूलच सहन होत नाही, असं एकंदरीत दिसतंय. पण 'पुन्हा येण्यात' अनेकदा अपयश येऊनही प्रयत्न न सोडण्याची त्यांची जिद्द बघता त्यांचं कौतुकही करावंसं वाटतं. आपले राजकीय मनसुबे पूर्ण करण्यासाठी विरोधी पक्षनेते दिल्ली जाऊन आले तरी त्यांचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत हे सत्य आहे. परंतु दिल्ली भेटीत त्यांनी महाराष्ट्राचे प्रलंबित विषय मांडले असतील तर त्यांचा दिल्ली दौरा तरी सार्थकी लागेल असं म्हणायला हरकत नसल्याचंही रोहित पवार म्हणाले.
 

Web Title: ncp leader rohit pawar slams former chief minister devendra fadnavis over meeting dlhi home ministry maharashtra issues social media facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.