राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 03:45 PM2021-06-18T15:45:07+5:302021-06-18T15:49:39+5:30

राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.

nana patole says we will celebrate rahul gandhi birthday as sankalp diwas | राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले

राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले

Next
ठळक मुद्देराहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणारमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची माहितीटिळक भवन नुतनीकरणाचा शुभारंभ व पक्ष प्रवेश कार्यक्रम होणार

मुंबई: खासदार राहुल गांधी यांचा १९ जून रोजी वाढदिवस असून या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे. कोरोनाचे संकट असल्याने वाढदिवसाला उत्सवी स्वरुप न देता गोरगरिब जनतेला रेशन, अन्नधान्य, औषधे, वैद्यकीय साहित्य वाटप तसेच कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकरी कुटुंबांनाही मदत करण्याचा संकल्प काँग्रेसने केला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. (nana patole says we will celebrate rahul gandhi birthday as sankalp diwas)

यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, मागील दीड वर्षांपासून देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. या कोरोनाने शेतकरी, कष्टकरी, कामकरी, हातावरचे पोट असणाऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्याने लाखो बेरोजगार झाले. पंतप्रधानांनी कोरोना काळात जनतेच्या जिवीताशी खेळ केला असून ‘आपली प्रतिमा संवर्धन’ करण्यासाठी इव्हेंटबाजीवरच जास्त लक्ष दिले. कोरोनाने देशात विदारक चित्र असताना राहुलजींचा वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरा करणे काँग्रेस विचाराला पटणारे नाही. हे लक्षात घेऊन राहुलजींचा वाढदिवस हा ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा केला जाणार आहे.  

राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस नेते व पदाधिकारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत तर पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल, एलपीजी गॅसच्या महागाईविरोधात महिला काँग्रेस गॅस कार्यालय आणि पेट्रोल पंपासमोर संकल्प करणार आहेत. युवक काँग्रेस/एनएसयुआयचे कार्यकर्ते यावेळी बेरोजगारीविरोधात आंदोलन करून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करतील. देशाला वाचवायचे असेल तर राहुल गांधी यांच्याशिवाय पर्याय नसून २०२४ साली राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प या दिवशी केला जाणार आहे, असेही पटोले यांनी सांगितले.
 
विद्यार्थ्यांना आरजी किटचे वाटप...

खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काँग्रेसच्यावतीने गांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेल्या ‘आरजी किट’ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे. आ. कुणाल पाटील, उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
आरजी किट वाटपाचा हा कार्यक्रम एनएसयुआयचे संदीप पांडे यांनी आयोजित केला होता.

टिळक भवन नुतनीकरणाचा शुभारंभ व पक्ष प्रवेश कार्यक्रम

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश काँग्रेसचे दादर येथील नूतनीकरण केलेल्या टिळक भवन या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या शुभहस्ते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते व मंत्री उपस्थित राहणार आहेत. यानंतर  पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे. माजी अर्थराज्यमंत्री डॉ. सुनिल देशमुख हे आपल्या सहका-यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यासोबतच राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
 

Web Title: nana patole says we will celebrate rahul gandhi birthday as sankalp diwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.