मोदी-ठाकरेंच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकारणही ढवळून निघाले; तर्कांना उधाण, दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले, भेटीत गैर काहीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:42 AM2021-06-09T06:42:12+5:302021-06-09T06:42:45+5:30

Modi-Thackeray : ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती. जवळपास तीस वर्षे युतीचे राजकारण करणारे भाजप-शिवसेना यांच्यात आज कमालीची कटूता दिसून येत आहे.

Modi-Thackeray's 'One to One' visit also stirred politics; the leaders of both parties said there was nothing wrong with the meeting | मोदी-ठाकरेंच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकारणही ढवळून निघाले; तर्कांना उधाण, दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले, भेटीत गैर काहीच नाही

मोदी-ठाकरेंच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकारणही ढवळून निघाले; तर्कांना उधाण, दोन्ही पक्षांचे नेते म्हणाले, भेटीत गैर काहीच नाही

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नवी दिल्लीतील पंचेचाळीस मिनिटांच्या ‘वन टू वन’ भेटीने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत नेमके काय बोलणे झाले असेल या बाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेत बेबनाव झाला आणि शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसची साथ घेत महाविकास आघाडी सरकार तयार केले.

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यात झालेली ही पहिलीच भेट होती. जवळपास तीस वर्षे युतीचे राजकारण करणारे भाजप-शिवसेना यांच्यात आज कमालीची कटूता दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर ही एकांतातील भेट चर्चेचा विषय ठरली आहे. सरकारला कोणताही धोका नाही असे तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते सातत्याने सांगत आले आहेत. तथापि, भाजप-शिवसेनेने पुन्हा एकदा एकत्र येण्यासंदर्भात मोदी-ठाकरे यांच्यात काही चर्चा झाली असावी, असा तर्क देण्यात येत आहे. त्यातच या भेटीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

‘आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही पण याचा  अर्थ नाते तुटले असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काहीही चुकीचे नाही. मी काही नवाझ शरिफना भेटायला गेलो नव्हतो. मोदींना भेटण्यात काहीही गैर नाही’, असे सूचक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत. या वक्तव्यातून उद्या भाजप-शिवसेनेची युती लगेच होईल असा तर्क काढणे राजकीय अपरिपक्वपणा ठरेल, पण भाजप आणि मोदींशी कटुतेचे संबंध संपावेत, अशी ठाकरे यांची इच्छा असल्याचे त्यातून प्रतीत होते.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुना मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेनेला मोदी यांनी आज ठाकरेंबरोबरच्या भेटीत नेमकी काय साद घातली, हे पुढील काळातील संभाव्य राजकीय घटनांवरूनच स्पष्ट होईल. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत काहीही गैर नाही. मुख्यमंत्री हे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटतात तेव्हा नंतर स्वतंत्रपणे भेटतात, असा प्रघात आहे. त्यानुसार दोघांची भेट झाली असावी, असे मत व्यक्त केले.

‘सत्तांतराची नांदी’
मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची दिल्लीत घेतलेली भेट ही राजकीय तडजोडीसाठी असून, भविष्यात देवाणघेवाणीतून सत्तांतर होऊ शकते, अशी शक्यता भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधानांकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा सुरू झाली, त्याच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मी त्यांच्याशी नंतर फोनवर बोलेनच, असेही मोदी म्हणाले.

जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. चर्चा होते याचा अर्थ ती नक्कीच महत्त्वाची असणार. मुख्यमंत्री आधी अजित पवार आणि अशोक चव्हाणांसोबत आणि नंतर एकटे भेटले, या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
- खा. संजय राऊत, 
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वतंत्रपणे भेटल्याने भीती वाटण्याचे कारण नाही. या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये. महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे आणि ते पाच वर्षे ठीक टिकेल.
- जयंत पाटील, 
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी

शिवसेनेशी आमचा संबंध तीस वर्षांपासूनचा आहे. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांची भेट घेतली यात गैर काहीही नाही. ‘शिवसेनेची भूमिका नेहमीच देव, देश अन् धर्मासाठी’ अशी राहिली. सध्या त्यांच्या विचारांचे अपहरण झाले एवढेच.
- सुधीर मुनगंटीवार, 
भाजपचे ज्येष्ठ नेते

Web Title: Modi-Thackeray's 'One to One' visit also stirred politics; the leaders of both parties said there was nothing wrong with the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.