"जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:41 AM2021-05-16T05:41:30+5:302021-05-16T05:44:14+5:30

मंत्री अशोक चव्हाण यांची भाजपवर कठोर टीका

Minister Ashok Chavan Criticized BJP Devenedra Fadnavis & Central Government over Corona Situation | "जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही"

"जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी स्मशानाला पत्रे ठोकण्याचे काम महाराष्ट्राने केले नाही"

Next
ठळक मुद्देदेशाच्या कोरोना परिस्थिताला जणू महाराष्ट्रच जबाबदार आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातून जाणवते.यंदा पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने लाखो लोक गोळा केले. कुंभमेळ्याबाबत निष्काळजीपणा केलादेशातील कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचे आत्मपरीक्षण फडणवीस यांनी केले पाहिजे

मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य असल्याने आपण अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे, यात दुमत नाही; पण महाराष्ट्रावर प्रेम करणारा एक सच्चा मराठी नागरिक म्हणून मला किमान हे समाधान आहे की, माझ्या राज्याने कोरोनाचे रुग्ण आणि मृतकांच्या संख्येबाबत लपवाछपवी केली नाही, असा टोला लगावत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर कठोर टीका केली. शासकीय नोंदीमध्ये मृतांची संख्या बोटावर मोजण्याइतपत ठेवून स्मशानात रात्रंदिवस जळणाऱ्या चिता लपविण्यासाठी पत्रे ठोकण्याचे पाप महाराष्ट्राने केले नाही, असेही चव्हाण म्हणाले.

अंत्यसंस्कारासाठी मोठी रांग आहे, लाकडे नाहीत, जागा नाही म्हणून शेकडो मृतदेह नदीत बेवारस सोडून देण्याचे कुकर्म महाराष्ट्राने केले नाही. आरोग्य यंत्रणेतील त्रुटी किंवा ऑक्सिजन, लसींच्या तुटवड्यावर बोलाल तर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करण्याची, संपत्ती जप्त करण्याची धमकी महाराष्ट्राने नागरिकांना दिली नाही असे सांगत चव्हाण पुढे म्हणाले, हे सारे प्रकार ज्या राज्यात घडले, तिथे भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फडणवीस यांनी एखादे खरमरीत पत्र लिहिले तर त्यातून तिथल्या राज्य सरकारांच्या कामात सुधारणा होईल.

देशाच्या कोरोना परिस्थिताला जणू महाराष्ट्रच जबाबदार आहे, अशी शंका देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रातून जाणवते. भाजपवरील महाराष्ट्रद्रोही हा ठपका ते या पत्रातून खरा ठरवीत आहेत. त्यांना माझी विनंती आहे की, आपल्या राज्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करू नका. भारतात कोरोना कसा वाढला, ते अख्ख्या देशाला आणि आता संपूर्ण जगाला कळून चुकले आहे. खा. राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी वेळीच इशारा दिला होता; पण भाजपने त्यांची थट्टा केली, असे चव्हाण म्हणाले. 

यंदा पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने लाखो लोक गोळा केले. कुंभमेळ्याबाबत निष्काळजीपणा केला. कोरोनाऐवजी निवडणुकीला प्रथम प्राधान्य दिले. त्यामुळे देशातील कोरोनावाढीचा ठपका महाराष्ट्रावर ठेवण्याऐवजी हे खरे पाप कोणाचे, याचे आत्मपरीक्षण फडणवीस यांनी केले पाहिजे, तसेच या सगळ्या मुद्यांवर त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र पाठविण्याचे धाडस दाखविले पाहिजे, असेही चव्हाण म्हणाले.

Web Title: Minister Ashok Chavan Criticized BJP Devenedra Fadnavis & Central Government over Corona Situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.