राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी

By बाळकृष्ण परब | Published: October 13, 2020 04:45 PM2020-10-13T16:45:28+5:302020-10-13T19:12:37+5:30

Rajya Sabha Election News : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे.

Election announcement for 11 Rajya Sabha seats, an opportunity for BJP to make a big win | राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी

राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, भाजपाला मोठी मुसंडी मारण्याची संधी

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील राज्यसभेच्या १० सदस्यांचा कार्यकाळ हा २५ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहेउत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश या सर्व ११ जागांवर २७ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल केले जातील. तर ९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल

नवी दिल्ली - राज्यसभेच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ११ जागांसाठी निवडणुकीचा घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील १० आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. या सर्व ११ जागांवर २७ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल केले जातील. तर ९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मतदानाच्या दिवशीच मतमोजणी होईल आणि निकाल ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल.

उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या १० सदस्यांचा कार्यकाळ हा २५ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे. यामधील बहुतांश सदस्य हे समाजवादी पार्टीचे आहेत. सपाचे चंद्रपाल यादव, रवि प्रकाश वर्मा, विश्वंभर प्रसाद निषाद, जावेद अली खान, प्राध्यापक रामगोपाल यादव यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. भाजपाच्या कोट्यातील अरुण सिंह आणि नीरज शेखर यांच्या जागा रिक्त होत आहेत. याशिवाय बसपाचे वीर सिंह आणि राजाराम तसेच काँग्रेसचे पीएल पुनिया यांचाही कार्यकाळ समाप्त होत आहे. तर काँग्रेसचे उत्तराखंडमधील राज्यसभा खासदार राज बब्बर यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सध्या एकूण ३९५ सदस्य आहेत. तर आठ जागा रिक्त आहेत. त्यापैकी सात जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेच्या सध्याच्या सदस्यसंख्येनुसार नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक सदस्याला ३७ मतांची गरज आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या भाजपाकडे ३०६ आमदार आहेत. तर अपना दलच्या ९ आणि ३ अपक्ष आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे. तर विरोधी पक्षात असलेल्या सपाकडे ४८, काँग्रेसकडे ७, बसपाकडे १८ आणि ओमप्रकाश राजभर यांच्यापक्षाकडे ४ सदस्य आहेत.

आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा पैकी आठ जागांवर भाजपाला सहज विजय मिळू शकतो. त्याशिवाय भाजपाला अजून काही आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपाला नवव्या जागेवरही सहजपणे विजय मिळू शकतो. तर सपाला आपल्या सदस्यसंख्येनुसार सपाला एका जागेवर विजय मिळू शकतो. तर बसपा आणि काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळण्याची शक्यता नाही. या निवडणुकीत सपाला पाच जागांवर तर बसपाला दोन जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भाजपाला सहा ते सात जागांवर फायदा होण्याची चिन्हे आहेत.

राज्यसभेमध्ये सध्या एकूण २४५ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे १०० हून अधिक सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत भाजपाचे ८५, जेडीयूचे पाच, बीपीएफ १, आरपीआय १, एनपीएफ १, एमएनएफ १ आणि राष्ट्रपती नियुक्त ७ असे मिळून १०१ सदस्यांचा पाठिंबा आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ११ पैकी १० जागांवर भाजपाला यश मिळाल्यास हा आकडा १२० पर्यंत जाईल. त्यामुळे राज्यसभेत पहिल्यांदाच बहुमताजवळ जाण्याची संधी भाजपाकडे असेल.

Web Title: Election announcement for 11 Rajya Sabha seats, an opportunity for BJP to make a big win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.