"दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:29 PM2021-02-13T16:29:34+5:302021-02-13T16:38:03+5:30

Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Government over Shivjayanti : शिवजयंतीवरून सचिन सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

Congress Sachin Sawant Slams Modi Government over Shivjayanti | "दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही"

"दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही"

googlenewsNext

मुंबई - कोरोना सध्या नियंत्रणात असला तरी राज्य असो वा केंद्र सरकार विशेष खबरदारी घेत आहे, १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातशिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे, तत्पूर्वी ठाकरे सरकारने शिवजयंती कशी साजरी करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यावरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यानंतर आता शिवजयंतीवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. "दाढी वाढवून स्वतःची शिवरायांशी तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना राजधर्म कळणार नाही" असं म्हणत सावंत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना विकणारे, शिवस्मारकात भ्रष्टाचार करणारे, नरेंद्र मोदीजींची तुलना शिवरायांबरोबर करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या भाजपाने महाराजांच्या जयंतीबाबत आम्हाला शिकवण देऊ नये. त्यांनी मोदींचा वाढदिवस साजरा करावा. कोरोनाचा संकटकाळ आहे हे विसरता कामा नये" असं म्हटलं आहे. तसेच "शिवराय हे रयतेचे राजे होते. शिवराय आमचे आदर्श आहेत. आमच्या हृदयात आहेत. रयत संकटात असताना त्यांनी जी भूमिका घेतली असती तीच मविआ सरकार घेत आहे. शिवरायांचा राजधर्म हाच होता. दाढी वाढवून स्वतःची शिवरायांबरोबर तुलना करणाऱ्या गोळवलकरांच्या शिष्यांना तो कळणार नाही" असं म्हणत टोला लगावला आहे. 

"१० ऐवजी १०० वाचावे"; ठाकरे सरकारनं शिवजयंतीच्या परिपत्रकातील 'ती' चूक सुधारली!

ठाकरे सरकारने शिवजयंती कशी साजरी करावी यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र या मार्गदर्शक सूचना देत असताना ठाकरे सरकारला एका चुकीचा फटका बसला आहे, शिवजयंती साजरी करताना केवळ १० जणांच्या उपस्थितीत साजरी करावी असं परिपत्रक गृह विभागाकडून काढण्यात आलं होतं, परंतु ठाकरे सरकारच्या या निर्णयावर शिवप्रेमींकडून टीका होत असताना पुन्हा यातील चूक सुधारत गृह विभागाने दुसरं शुद्धिपत्रक काढलं, यात म्हटलं आहे की, शासन परिपत्रक ११ फेब्रुवारी २०२१ मधील मुद्दा ३ मधील ओळ क्रमांक ४ मध्ये सुधारणा करण्यात येत असून आता १० ऐवजी १०० असे वाचावे, असं स्पष्टीकरण दिलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करताना १०० जणांच्या उपस्थितीला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. शिवजयंती हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दि. १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड- १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजयंती साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Congress Sachin Sawant Slams Modi Government over Shivjayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.