Congress is the only party of one family - Narendra Modi | Narendra Modi Exclusive Interview: काँग्रेस हा तर केवळ एका कुटुंबाचाच पक्ष - नरेंद्र मोदी
Narendra Modi Exclusive Interview: काँग्रेस हा तर केवळ एका कुटुंबाचाच पक्ष - नरेंद्र मोदी

ऋषी दर्डा, संपाकदीय संचालक, लोकमत

यदु जोशी, वरिष्ठ सहायक संपादक

मुंबई : काँग्रेस पक्ष एकाच कुटुंबासाठी आणि कुटुंबाकडून चालविला जाणारा पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देसम, राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष या सर्वांची स्थितीही तशीच आहे. पण भाजपचा पुढील अध्यक्ष कोण असेल, हे तुम्ही-आम्ही सांगू शकत नाही. अन्य पक्ष व भाजप यांच्यात हाच फरक आहे. घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व एका कुटुंबासाठी असते. खासगी कंपनीच्या अविर्भावात ते पक्ष चालवत असतात, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या घाईगडबडीत शुक्रवारच्या मुंबई दौऱ्यात देशातील सर्वाधिक खपाच्या लोकमत या मराठी दैनिकाला सविस्तर मुलाखत दिली. लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा व वरिष्ठ सहाय्यक संपादक यदु जोशी यांच्या अडचणींच्या प्रश्नांनाही त्यांनी दिलखुलास व सविस्तर उत्तरे दिली. 

देशात प्रथमच सरकारच्या बाजूने लाट दिसत आहे. लोक आमच्या कामावर समाधानीच नव्हे, तर खुश आहेत. तेच आम्हाला पुन्हा निवडून देऊ इच्छित आहेत. त्यामुळे आमचा विजय निश्चितच आहे, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला. ते म्हणाले की आपल्याला बहुमत मिळेल, असे विरोधकही बोलायला तयार नाही. आमच्या जागा गेल्या वेळेपेक्षा, २0१४ पेक्षा अधिक येतील, एवढेच ते सांगत आहेत. त्यांच्या मुलाखतीचा हा सारांश.

  • साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून दिलेली उमेदवारी आणि त्यांचे विधान यावरून भाजपवर बरीच टीका होत आहे. या बद्दल आपले मत काय?

साध्वींना दिलेली उमेदवारी हा मुळात वादाचा मुद्दा नाहीच. वसुधैव कुटुंबकम् अशी भारताची पाच हजार वर्षांची प्राचीन संस्कृती बदनाम करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असतो. जगाला बौद्धिक आणि वैज्ञानिक ज्ञान देणाºया या संस्कृतीला कमी लेखण्याचे कुटील काम काँग्रेसने मतांसाठी केले. त्यामुळे प्रज्ञासिंह यांची उमेदवारी ही काँग्रेसने केलेल्या या पापाचा जाब विचारण्यासाठी आहे.

  • नोटाबंदी यशस्वी झाली असे आपल्याला वाटते का? की त्यात काही चुका झाल्या?

काळ्या पैशाविरुद्धच्या लढ्यात आम्हाला चांगले यश मिळाले. गेल्या साडेचार वर्षांत आम्ही काळ्या पैशाविरुद्ध जी पाऊले उचलली त्यामुळे १.३० लाख कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले. तसेच सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणि जप्ती आली. ६ हजार ९०० कोटी रुपयांच्या बेनामी मालमत्ता आणि १६०० कोटी रुपयांच्या परकीय मालमत्ता ही जप्तीखाली आल्या आहेत. या खेरीज, ३.३८ लाख ‘शेल’ कंपन्यांचा छडा लावून त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. नोटाबंदीसारख्या उपाययोजनांचाच परिणाम म्हणून आता करदात्यांची संख्या आता दुप्पट झाली आहे. नोटाबंदी अत्यंत परिणामकारक ठरली. पण विरोधकांचे म्हणाल तर नोटाबंदीमुळे त्यांचा बराच माल गेल्यामुळे त्यांच्याकडून टीका होणे स्वाभाविक आहे.

  • सीएमआयईच्या अहवालानुसार बेरोजगारीचे प्रमाण २०१९ मध्ये ७.२ टक्के इतके आहे. बेरोजगारीचा प्रश्न आपण कसा हाताळणार?

आपल्या प्रश्नाचा पहिला भाग चुकीचा आहे. रोजगाराबाबत गेल्या पाच वर्षांत युवकांसाठीच्या संधींमध्ये कितीतरी वाढ झाली आहे. बेरोजगारीबद्दल जे काही टीकात्मक बोलले जात आहे त्याला वास्तवाचा आधार नाही. साडेचार कोटी नवउद्योजकांना मुद्रा योजनेत अर्थसहाय्य करण्यात आले. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व कामगार राज्य विमा योजना यामध्ये १ कोटी २० लाख सदस्यांची वार्षिक वाढ होणे यावरूनच तेवढे नवे औपचारिक रोजगार तयार झाले हे स्पष्ट होते. सीआयआयच्या सर्वेक्षणनुसार मध्यम व लघु उद्योगांमध्ये ६ कोटी नवे रोजगार चार वर्षांत तयार झाले. नॅसकॉमच्या आकडेवारीनुसार २०१४ ते २०१७ या काळात आयटी-बीपीओ, रिटेल, वस्रोद्योग व ऑटोमोटिव्ह या क्षेत्रांमध्ये १ कोटी ४० लाख रोजगारांची निर्मिती झाली.

सविस्तर मुलाखत वाचा - देशात सर्वत्र सरकारच्या बाजूनेच लाट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास


Web Title: Congress is the only party of one family - Narendra Modi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.