हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश?; फेसबुक पोस्ट करत दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:36 PM2021-06-15T12:36:13+5:302021-06-15T12:44:33+5:30

Congress Hardik Patel And AAP Arvind Kejriwal : केजरीवाल यांच्या गुजरात भेटीदरम्यान, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांची जोरदार चर्चा रंगली आहे.

congress hardik patel aap arvind kejriwal facebook post attack bjp | हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश?; फेसबुक पोस्ट करत दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

हार्दिक पटेल करणार आम आदमी पक्षात प्रवेश?; फेसबुक पोस्ट करत दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (AAP Arvind Kejriwal) हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. केजरीवाल यांच्या गुजरात भेटीदरम्यान, प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Congress Hardik Patel) यांची जोरदार चर्चा रंगली आहे. हार्दिक पटेल आपमध्ये सामील होऊ शकतात अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या. मात्र यावर आता हार्दिक यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. हार्दिक पटेल यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अशा बातम्यांबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. या बातम्या बनावट असल्याचं म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी कोरोना कालावधीत भाजपा आपले अपयश लपविण्यासाठी बनावट बातम्या पेरत असल्याचं म्हटलं आहे. फेसबुकवर यासंदर्भात त्यांनी पोस्ट लिहिली आहे. "विविध माध्यमांवर मी आम आदमी पक्षात सामील झाल्याची आणि विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा चेहरा बनण्याची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. या बातम्या निराधार आणि खोट्या आहेत. काँग्रेस समर्थक, कामगार आणि पाटीदार समाजात संभ्रम पसरवण्याच्या उद्देशाने भाजपाकडून या बातम्या पेरण्यात आल्या आहेत" असं म्हटलं आहे.

हार्दिक यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये "काँग्रेस पक्षाच्या 130 वर्षांपेक्षा जास्त इतिहासात मी सर्वात कमी वयाचा कार्यकारी अध्यक्ष आहे. माझे काँग्रेसमध्ये सामील होण्याचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे शेतकरी विरोधी, गरीब विरोधी आणि पाटीदार विरोधी भाजपाला गुजरातमधील सत्तेतून काढून टाकणं. 2014 नंतर देशातील आणि गुजरातमधील समाजातील सर्व घटकांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे" असं म्हटलं आहे. तसेच "कार्यकारी अध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण तयारीसह पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे जेणेकरुन 2022 मध्ये गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन होऊ शकेल. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देशातील अनेक सक्रिय तरुणांना पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे, त्यातील मी एक ज्वलंत उदाहरण आहे" असंही म्हटलं आहे.

"ज्या कोणालाही भाजपाच्या कुशासनविरूद्ध लढा मजबूत करायचा असेल त्याचे गुजरातमध्ये स्वागत आहे. काँग्रेस हीच गेल्या विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापनेच्या अगदी जवळ आली होती. कोरोनाच्या गंभीर काळात शेजारच्या राजस्थान, महाराष्ट्रामधील काँग्रेस पक्षाची कामगिरी गुजरातमधील लोकांनी पाहिली आहे आणि मला खात्री आहे की 2022 नंतर लोक आपल्याला पूर्ण बहुमताने राज्याची सेवा करण्याची संधी देतील" असं हार्दिक पटेल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.  तसेच यावरुन हार्दिक पटेल आपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: congress hardik patel aap arvind kejriwal facebook post attack bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.