"हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 08:52 PM2021-06-26T20:52:43+5:302021-06-26T20:55:19+5:30

Chirag Paswan And Narendra Modi : चिराग पासवान यांनी स्वत:ला हनुमान म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामाची उपमा दिली आहे.

chirag paswan says no ram can be silent when hanuman is being killed | "हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास"

"हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास"

Next

नवी दिल्ली - लोक जनशक्ती पक्षात (एलजीपी) काका पशुपती पारस आणि पुतण्या चिराग पासवान यांच्यातील वादानंतर पक्षात आता घमासान सुरू झालं आहे. पशुपती पारस यांनी मंगळवारी चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं तर दुसरीकडे चिराग पासवान यांनी पक्षाच्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. बिहारमधीलराजकारणाला आता वेगळच वळण मिळताना दिसत आहे. कारण चिराग पासवान यांनीही आता आक्रमक भूमिका घेत राजकीय खेळी खेळली आहे. याच दरम्यान चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी स्वत:ला हनुमान म्हणतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना रामाची उपमा दिली आहे.

"हनुमानाचा राजकीय वध होत असताना राम शांत बसणार नाहीत असा विश्वास मला वाटतोय" असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. "मी आजपर्यंत हनुमानाप्रमाणे पंतप्रधानांना प्रत्येक अडचणीच्या काळात साथ दिली. आज जेव्हा हनुमानाचा राजकीय वध करण्याचा प्रयत्न होत असताना मला विश्वास आहे की अशा परिस्थितीत राम शांत बसणार नाहीत. मी प्रत्येक मुद्द्यावर भाजपाच्या सोबत उभा राहिलो. मग तो सीएए, एनआरसीचा मुद्दा का असेना. पण नितिश कुमार यांनी त्याला विरोध केला. आता भाजपाला निर्णय घ्यायचाय की त्यांनी मला पाठिंबा द्यायचा की नितिश कुमार यांना" असं देखील पासवान यांनी म्हटलं आहे. 

"माझे वडील आणि लालू प्रसाद यादव हे नेहमीच चांगले मित्र राहिले आहेत. राजदचे नेते तेजस्वी यादव आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आमची घट्ट मैत्री होती. ते माझे लहान बंधू आहेत. जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा आघाडीसंदर्भात पक्ष अंतिम निर्णय घेईल" असंही चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चिराग पासवान यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवणं काही सोपं काम नसल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे. शांत असलेल्या चिराग पासवान यांनी आता डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. 

"पक्षाच्या संविधानानुसार पक्षाचा अध्यक्ष स्वेच्छेनं किंवा त्यांचं निधन झाल्यानंतरच बदलता येऊ शकतं", असं पक्षाचे प्रवक्ते अशरफ अन्सारी यांनी सांगितलं. त्यामुळे चिराग पासवान हेच पक्षाचे अध्यक्षपदी अजूनही कायम आहेत असा दावा करण्यात आला आहे. चिराग पासवान यांच्याविरोधात बंडखोरी केलेल्या पाच खासदारांबाबत निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेतलं आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण चिराग पासवान यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या अधिकारांचा वापर करुन तांत्रिकदृष्ट्या बंडखोरी केलेल्या खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे पाचही खासदार निवडणूक आयोगाकडे गेले तरी चिराग पासवान यांच्याकडे पक्षाच्या बहुमतानं खासदारांना पक्षातून काढण्यात आल्याचं तगडं कारण हाताशी आहे. 

Web Title: chirag paswan says no ram can be silent when hanuman is being killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.