निवडणुकीच्या धामधुमीत ६ अधिकाऱ्यांना सीबीआय आणि ईडीने बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 05:01 AM2021-03-21T05:01:35+5:302021-03-21T05:02:01+5:30

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही असा आरोप यापूर्वी केला असून केंद्रीय तपास संस्थांच्या निवडणुकीतील सहभागाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

CBI and ED issue summons to 6 officials | निवडणुकीच्या धामधुमीत ६ अधिकाऱ्यांना सीबीआय आणि ईडीने बजावले समन्स

निवडणुकीच्या धामधुमीत ६ अधिकाऱ्यांना सीबीआय आणि ईडीने बजावले समन्स

Next

कोलकता : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पश्चिम बंगालच्या सहा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना सीबीआय आणि ईडी या केंद्रीय तपास संस्थांनी तीन वेगवेगळ्या प्रकरणांत समन्स बजावले आहे.  या अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात तपास संस्थांसमोर हजर व्हायचे आहे.

सीबीआय आणि ईडीचे समन्स मिळालेल्या अधिकाऱ्यांत राज्याचे सुरक्षा सल्लागार सुरजित कार पुरकायस्थ (शारदा चिटफंड घोटाळा), मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव गौतम संन्याल व अतिरिक्त मुख्य सचिव बी. पी. गोपालिका (मेट्रो डेअरी शेअर हस्तांतरण व निर्गुंतवणूक घोटाळा), जीएसटी विशेष आयुक्त (दुर्गपूर), अरुण प्रसाद, कोलकत्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण मीना आणि पश्चिम बंगाल पोलीस अधिकारी पार्था घोष (अवैध कोळसा खाण प्रकरण) यांचा समावेश आहे. त्याआधी शुक्रवारी ईडीने शारदा चिटफंड घोटाळ्यात तृणमूल काँग्रेसचे उमेदवार विवेक गुप्ता (जोरासंको) आणि मदन मित्रा (कामरहाती)  यांची चौकशी केली. तसेच सीबीआयने निमतिता रेल्वे स्टेशन स्फोट प्रकरणात तृणमूलचे उमेदवार इमानी बिस्वास (सुती) यांची चौकशी केली. तृणमूलचे राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन यांनी सांगितले की, भाजप सुडाचे राजकारण करीत असून केंद्रीय तपास संस्थांचा निवडणुकीत गैरवापर करीत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही असा आरोप यापूर्वी केला असून केंद्रीय तपास संस्थांच्या निवडणुकीतील सहभागाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

आणखी काही अधिकाऱ्यांना समन्स?
येत्या दोन ते तीन दिवसांत आणखी काही शासकीय अधिकाऱ्यांना समन्स बजावले जाऊ शकते, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये येत्या २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

Web Title: CBI and ED issue summons to 6 officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.