"उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्वबळावर लढणार"; वाढदिवशी मायावतींनी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:23 AM2021-01-15T11:23:49+5:302021-01-15T11:32:33+5:30

BSP Chief Mayawati News : उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत बीएसपीचा विजय निश्चित आहे असं मायावती यांनी म्हटलं आहे.

bsp chief mayawati declares bsp contest election alone in up and uttarakhand | "उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्वबळावर लढणार"; वाढदिवशी मायावतींनी केली मोठी घोषणा

"उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये स्वबळावर लढणार"; वाढदिवशी मायावतींनी केली मोठी घोषणा

Next

नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा कोणासोबतही आघाडी करणार नाही. आघाडीमुळे नुकसान होतं. उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुकीत बीएसपीचा विजय निश्चित आहे असं मायावती यांनी म्हटलं आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका बसपा स्वत:च्या बळावर लढवणार असल्याचं मायावतींनी जाहीर केलं आहे. आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे. 

देशात कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मायावती यांनी शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचं आवाहन केंद्र सरकारला केलं आहे. तसेच देशात सुरू होणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचंही मायावतींनी स्वागत केलं आहे. सर्व नागरिकांसाठी कोरोना लस मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मायावतींनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली. आपलं सरकार सत्तेत आलं तर उत्तर प्रदेशच्या प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस पुरवण्यात येईल, असं आश्वासनही मायावती यांनी दिलं आहे.

मायावती आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र यंदा कोरोनाच्या संकटाचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरीब, असहाय्य आणि कोरोना रुग्णांना मदत करण्याचा आग्रह मायावतींनी आपल्या कार्यकर्त्यांकडे केला आहे. "15 जानेवारी 2021 रोजी माझा 65 वा वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करताना साध्या पद्धतीनं तसंच पीडित, गरीब आणि असहाय्य लोकांना आपापल्या सामर्थ्यानुसार मदत करत 'जनकल्याणकारी दिवस' म्हणून हा दिवस साजरा करावा" असं आवाहन मायावतींनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. 

मायावती या मूळ गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील बादलपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रभू दयाल हे सरकारी नोकरीत होते. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणासाठी दिल्ली येथे शिफ्ट झाले होते. यानंतर मायावती आणि त्यांच्या सर्व भावंडांचे शिक्षण दिल्ली येथेच झाले. मायावती यांना आयएएस अधिकारी बनवण्याची प्रभू दयाल यांची इच्छा होती. मात्र, बसपा संस्थापक कांशीराम यांच्या संपर्कात आल्यानंतर मायावती यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला. यानंतर त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीही झाल्या होत्या.


 

Web Title: bsp chief mayawati declares bsp contest election alone in up and uttarakhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.