BJP will give six seats, Shivsena will get two assembly elections: Alliance of alliance in the district will be decided | भाजप घेणार सहा, तर शिवसेनेला देणार दोन विधानसभा निवडणूक
भाजप घेणार सहा, तर शिवसेनेला देणार दोन विधानसभा निवडणूक

ठळक मुद्देयुतीचे सांगली जिल्ह्यातील जागावाटप निश्चित

श्रीनिवास नागे ।
सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला, तर दोन शिवसेनेला देण्यात येणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत दक्षिण महाराष्टत लक्षणीय यश मिळवल्याने भाजप आणि शिवसेनेने उचल खाल्ली आहे. तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीतही एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. लोकसभेवेळी सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, माढा, सोलापूर हे पाच मतदारसंघ युतीकडे खेचून आणण्याची कामगिरी महसूलमंत्री पाटील यांनी फत्ते केली. त्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील विधानसभेच्या जागांची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

युतीच्या २००९ मधील जागावाटपाच्या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठपैकी तीन मतदारसंघ भाजपकडे होते. त्यात सांगली, मिरज, जतचा समावेश होता, तर खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव हे पाच मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आले होते. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी खानापुरातून शिवसेनेचा, तर सांगली, मिरज, जत, शिराळ्यातून भाजपचे आमदार निवडून आले.

गेल्या पाच वर्षांत ही राजकीय परिस्थिती आणखी बदलली असून पक्षाचे वर्चस्व वाढल्याचा दावा भाजप करत आहे. त्यामुळे सांगली, मिरज, जत, शिराळ्यासह पलूस-कडेगाव आणि इस्लामपूर हे सहा मतदारसंघ भाजपने मागितले आहेत. जागांच्या तडजोडीमध्ये युतीच्या नेत्यांकडून त्यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री पाटील यांनी या सहा जागांवरील इच्छुकांना तयारीचा वेग वाढवण्यास सांगितले आहे. सांगलीतून सुधीर गाडगीळ, मिरजेतून सुरेश खाडे या विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
जतमध्ये आमदार विलासराव जगताप यांना पक्षांतर्गत विरोध आहे.

मात्र जगताप यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ सर्वाधिक असल्याचे पक्षांतर्गत अहवालात म्हटले आहे. शिराळ्यातून आ. शिवाजीराव नाईक आणि सम्राट महाडिक इच्छुक आहेत. आ. नाईक यांच्या संस्था अडचणीत आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे या उमेदवारीवर सर्वाधिक खल सुरू आहे.


आता ‘लक्ष्य’ : इस्लामपूर, पलूस-कडेगाव
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर आणि पलूस-कडेगाववर लक्ष केंद्रित केले असून, दोन्ही जागा भाजपसाठी मागून घेण्यात येत आहेत. इस्लामपुरात भाजपकडून नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहूल महाडिक, गौरव नायकवडी इच्छुक आहेत. युतीतील घटकपक्ष रयत क्रांती संघटना भाजपच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याने त्यांच्याबाबतही चर्चा सुरू आहे. पलूस-कडेगावमधून संग्रामसिंह देशमुख यांचे नाव आधीच जाहीर करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभेच्या तयारीला लागलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील जागावाटपावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे. आठपैकी सहा मतदारसंघ भाजपला, तर दोन शिवसेनेला देण्यात येणार आहेत.


अजितराव घोरपडेंचे काय?
खानापूर आणि तासगाव-कवठेमहांकाळ या दोन जागा शिवसेनेला सोडण्यात येणार असून खानापुरातून अनिल बाबर यांची उमेदवारी निश्चित आहे. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे प्रबळ दावेदार असले तरी त्यांनी भाजपकडूनच लढणार, शिवसेनेकडून नाही, असे सांगितले आहे. तथापि घोरपडेंना शिवसेनेत पाठवून उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.


Web Title:  BJP will give six seats, Shivsena will get two assembly elections: Alliance of alliance in the district will be decided
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.