लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही 'वाझे' हवेत का?, भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 05:40 PM2021-08-02T17:40:57+5:302021-08-02T17:42:48+5:30

MPSC : लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीका माधव भांडारी यांनी केली आहे.

BJP Leader Madhav Bhandari criticizes Mahavikas Aghadi government on MPSC vacancy | लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही 'वाझे' हवेत का?, भाजपाचा सवाल

लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही 'वाझे' हवेत का?, भाजपाचा सवाल

Next

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाच्या 4 रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी ही पदे भरण्यासाठी अजित पवार यांनी 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे. ही चालढकल पाहता सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठी आघाडी सरकारला एखाद्या ‘वाझे’ ची प्रतीक्षा आहे का, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. (BJP Leader Madhav Bhandari criticizes Mahavikas Aghadi government on MPSC vacancy)

राज्य लोकसेला आयोगाचे एकूण 6 सदस्य असतात. या पैकी 4 सदस्यांच्या जागा अनेक महिन्यांपासून भरल्याच गेल्या नाहीत. आयोगाच्या सदस्यांच्या रिक्त जागा 31 जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. ही मुदत संपल्यावर अजितदादांनी या जागा भरण्यासाठी 30 सप्टेंबर ही तारीख जाहीर केली आहे. लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीका माधव भांडारी यांनी केली आहे.

याचबरोबर, आयोग सदस्यांच्या रिक्त जागा भरल्या न गेल्याने लोकसेवा आयोगाला पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. परीक्षा घेणे, निकाल लावणे, पदांची भरती करणे अशी आयोगाची अनेक कामे वेळेत पूर्ण होण्यात अडचणी निर्माण होतात. या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. शेकडो होतकरू युवक परीक्षा होण्याची आणि परीक्षांचा निकाल लागण्याची वाट बघत राहतात. लोकसेवा आयोगाच्या दिरंगाईमुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने आयोग सदस्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्या, अशी मागणीही माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

दरम्यान, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे नैराश्यामुळे पुण्यातील स्वप्नील लोणकर या मुलाने गेल्या महिन्यात आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपासह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली. त्यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त सदस्यांच्या जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, 31 जुलै येऊन गेल्यानंतरही अद्याप जागा न भरल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच, यावरून भाजपानेही टीका केली आहे.

रोहित पवारांचा राज्यपालांना टोला
एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. राज्य शासनाने एमपीएससी सदस्यांची यादी पाठवली आहे. विधान परिषद आमदारांची यादी नसल्याने आपण ती यादी तातडीने मंजूर कराल असा विश्वास वाटतो, असा सणसणीत टोला आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याने ट्विट करुन, 31 जुलैपूर्वी आपण एमपीएससी आयोगातील रिक्त जागा भरणार होता, त्याचे काय झाले?, असा सवाल विचारला. 

दरम्यान, ठाकरे सरकारने विधान परिषदेसाठी 12 आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. परंतु कित्येक महिने उलटून गेली तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती यादी मंजूर केलेली नाही आहे. यावरून रोहित पवार यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

Web Title: BJP Leader Madhav Bhandari criticizes Mahavikas Aghadi government on MPSC vacancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.