लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकार बेपर्वा; चित्रा वाघ यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 05:35 PM2021-02-09T17:35:56+5:302021-02-09T17:39:07+5:30

यवतमाळमध्ये पोलिओ डोसऐवजी मुलांना पाजण्यात आलं होतं सॅनिटाझर, या प्रकरणात अद्याप एफआर दाखल न झाल्याचं सांगत वाघ यांनी व्यक्त केला संताप

bjp leader chitra wagh criticize thackeray sarkar over yawatmal polio dose sanitizer to kids | लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकार बेपर्वा; चित्रा वाघ यांचा आरोप

लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही राज्य सरकार बेपर्वा; चित्रा वाघ यांचा आरोप

Next
ठळक मुद्देयवतमाळमध्ये पोलिओ डोसऐवजी मुलांना पाजण्यात आलं होतं सॅनिटायझरअद्याप एफआर दाखल न झाल्याचं सांगत वाघ यांनी व्यक्त केला संताप

"यवतमाळ येथे पोलिओच्या डोस ऐवजी सॅनिटायजर पाजणाऱ्या दोषींविरुद्ध अजुनही एफआयआर ही दाखल न करणारे महाविकास आघाडी सरकार लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीतही किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय पुन्हा आला आहे," अशी टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

"दहा दिवसापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात  बालकांना जीवनदान पोलिओ डोस ऐवजी सॅनिटायजर पाजण्याची घटना घडली. त्या मुलांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचे जीव वाचले. मात्र, राज्य सरकारने या घटनेतल्या दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. अशा प्रकारच्या घटनामध्ये सिव्हील सर्जनच्या अखत्यारीत समिती स्थापन करून समितीचा अहवाल पोलिसांना सादर केला जातो आणि मग त्यानुसार पोलीस हे दोषींवर गुन्हा दाखल करतात. मात्र, दहा दिवस उलटूनही राज्य सरकारने अशी समिती स्थापन केली नाही. परिणामी पोलिसांनीही कोणतीच कारवाई केलेली नाही. असे बेपर्वा सरकार महाराष्ट्राने या पूर्वी पाहिलेले नाही," असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. 

भंडाऱ्यातील रुग्णालयाला आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला महिना पूर्ण झाला. सोमवारी त्या घटनेतील आणखीन एका बालकाचा मृत्यू झाल्याने मृत बालकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतही राज्य सरकारने असाच निष्काळजीपणा दाखवला आहे. या प्रकरणीही अजुनही कोणावरही गुन्हा दाखल झालेला नसल्याचेही वाघ यांनी नमूद केले.

अत्याचारातील घटनेही आरोपींना अटक नाही

"आत्तापर्यंत राज्यात महिला अत्याचाऱ्याच्या ज्या ज्या घटना घडल्या, त्यातील एकाही घटनेत आरोपींना अटक झालेली नाही. राज्य सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांनाच राजाश्रय देताना दिसत आहे. आता तर लहान बालकांची सुरक्षे बाबतीतही या सरकारची बेपर्वा वृत्ती दिसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात तसे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ त्यानुसार जनतेलाच आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायची आहे. कारण सरकार म्हणून हे महाविकास आघाडी सरकार केवळ गुन्हेगारांचेच संरक्षण करणार आहे हेच या सगळ्या घटनांमधून स्पष्ट होताना दिसत आहे," असंही त्या म्हणाल्या.

Web Title: bjp leader chitra wagh criticize thackeray sarkar over yawatmal polio dose sanitizer to kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.