अनाचारी, दुराचारी तसेच भ्रष्टाचारी सरकारमुळे राज्याचे वाटोळे : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 02:39 PM2021-07-23T14:39:06+5:302021-07-23T14:41:02+5:30

जनतेच्या प्रश्नाशी सरकारचे घेणे-देणे नाही, बावनकुळे यांची टीका. ओबीसी आरक्षण ३० डिसेंबरपर्यंत न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी, बावनकुळे यांचा इशारा

bjp leader chandrashekhar bawankule slams mahavikas aghadi government over various issues | अनाचारी, दुराचारी तसेच भ्रष्टाचारी सरकारमुळे राज्याचे वाटोळे : चंद्रशेखर बावनकुळे

अनाचारी, दुराचारी तसेच भ्रष्टाचारी सरकारमुळे राज्याचे वाटोळे : चंद्रशेखर बावनकुळे

Next
ठळक मुद्देजनतेच्या प्रश्नाशी सरकारचे घेणे-देणे नाही, बावनकुळे यांची टीका.ओबीसी आरक्षण ३० डिसेंबरपर्यंत न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी, बावनकुळे यांचा इशारा

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकरी, शेतमजूर, उपेक्षित बारा बलुतेदार, कष्टकरी जनतेच्या अडीअडचणींशी काहीही देणेघेणे नाही. हे अनाचारी, दुराचारी तसेच भ्रष्टाचारी सरकार असून या सरकारमुळे राज्याचे वाटोळे होत असल्याची टीका माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केली. 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यांतर्गत युवावर्गाला जोडण्याच्या मोहिमेसाठी  चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवामोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांचे गुरुवारी सायंकाळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी भाजपच्या ‘वसंतस्मृती’ या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद झाली, त्या वेळी बावनकुळे बोलत होते. पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

मुघलशाहीकडे वाटचाल
चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका करीत म्हणाले की, राज्य सरकार नुसता वेळकाढूपणा करत आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी, समस्यांशी काही देणेघेणे नाही. सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत. पण ते आम्ही स्वबळावर लढू, आम्ही आमच्या पक्षाचे संघटन बळकट करू, अशा गप्पा मारत आहेत. जनता अडचणीत असताना यांना हे उद्योग सुचत आहेत. तुम्ही कसे लढणार हे २०२४ मध्ये ठरवा. पण आज राज्य चालवायची जबाबदारी तुमच्यावर आहे, ती जबाबदारी कोण पार पाडणार? असा सवाल उपस्थित करून बावनकुळे यांनी, हे राज्य आज हुकूमशाहीकडे, अराजकतेकडे, मुघलशाहीकडे चालले आहे. या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही युवा वॉरियर्सच्या माध्यमातून काम करत आहोत, असे सांगितले.

तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या गप्पामुळे राज्य पिछाडीवर
महाविकास आघाडी सरकारमधील  मंत्री हे फक्त वेळकाढूपणा करत आहेत. दररोज प्रत्येक जण फालतू विषयांवर नुसता मीडियाचा स्पेस घेतात. एक मंत्री काय बोलतो तर दुसरा भलतेच बोलतो. यामध्ये त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करीत सांगितले की, पटोले स्वबळाचा नारा देतात, मात्र धान्य घोट्याळ्याबाबत काही बोलत नाही. अशाच प्रकारे खासदार संजय राऊत हेदेखील रोज कोणत्या न कोणत्या विषयावर गप्पा मारतात, असेही बावनकुळे म्हणाले.

अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्य आज विकासाच्या दृष्टीने मागे चालले आहे. फडणवीस सरकार असताना राज्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होती. जे राज्य भारनियमनमुक्त झाले होते, ते राज्य आज भारनियमनाकडे वाटचाल करत आहे. राज्यात शेतकरी संकटात असताना हे सरकार त्यांना धीर देण्याऐवजी कचाट्यात पकडत आहे. आज शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळत नाही, त्यांचे वीज कनेक्शन खंडित केले जात आहे. कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केली. पण ती प्रत्यक्षात अंमलात आणली नाही. ही जनतेची दिशाभूल आहे. जनता यापुढे सरकारला माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील २५ लाख युवावर्गाला भाजपशी जोडणार
राज्यातील १८ ते २५ वयोगटातील २५ लाख युवावर्गाला जोडण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. या युवावर्गाला त्यांच्या कौशल्यानुसार व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. डिसेंबरपर्यंत त्यांची नोंदणी युवा वॉरियर्स म्हणून होणार. त्यांच्या कल्पना, ध्येय, मनातील प्रश्नांवर काम होणार आहे. युवकांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. हा युवावर्ग भविष्यात भाजपच्या पुढच्या पिढीचे नेतृत्त्व करणार, असेही ते म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा
उत्तर महाराष्ट्रात आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पण तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात लक्ष द्यायला तयार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये धमक असेल तर त्यांनी आजच उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करायला हवे, असे आव्हान देखील बावनकुळे यांनी दिले.

ओबीसी आरक्षण ३० डिसेंबरपर्यंत न दिल्यास मंत्र्यांना गावबंदी
ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवले. मराठा आरक्षण देताना फडणवीस सरकारने सर्व तांत्रिक बाबी तसेच कायदेशीर प्रक्रिया चाचपडून पाहिली होती. ते आरक्षण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय टिकवले होते. परंतु, राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याने मराठा आरक्षण गेले. तशीच परिस्थिती ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत घडली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निकाल देताना राज्य सरकारला एम्पिरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, आता राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून ओबीसींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले. राज्य सरकारने ३० डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर मंत्र्यांच्या गाड्यांना गावात फिरु देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: bjp leader chandrashekhar bawankule slams mahavikas aghadi government over various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.