...तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अट

By कुणाल गवाणकर | Published: November 23, 2020 10:52 AM2020-11-23T10:52:36+5:302020-11-23T10:53:21+5:30

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली

bjp leader chandrakant patil clears parties stand over alliance with mns | ...तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अट

...तरच मनसेशी युती करू; चंद्रकांत पाटील यांनी सांगितली महत्त्वाची अट

Next

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

चंद्रकांत पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपसोबत युती करणार का?; राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचं 'मनसे' उत्तर

काय म्हणाले होते प्रविण दरेकर?
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न दरेकर यांना विचारण्यात आला. त्यावर आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ असं सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे. 

दरेकर आता फारच मोठा झालाय; मनसेचा टोला
प्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. 'त्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे याबद्दल विचार करतील. राज साहेबांनी विचार करायला प्रविण दरेकर आता फारच मोठा झाला आहे,' असा टोला नांदगावकर यांनी लगावला. दरेकर आधी मनसेत होते. मनसेकडूनच ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मागाठाणे मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

'आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी'; मनसेचा घणाघात

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून रणनीती आखण्यासाठी बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिकेत भाजपाचा भगवा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता.

काय म्हणाले संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर अशी विधाने करु शकतात, भाजपाला वाटत असेल आता जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाही आणि ते जे कोणता भगवा फडकवणार असेल तो शुद्ध आहे याचा निर्णय जनता ठरवेल, मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी राज्यात १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीकडून मुंबईची कुंचबणा झाली आहे तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे, त्यात शिवसैनिक आघाडीवर आहे. हा इतिहास भाजपाने चाळला पाहिजे, या लोकांना मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. मुंबईत येणाऱ्या उद्योगपतींना हुसकावून त्यांच्या राज्यात नेतात, मुंबईचं महत्त्व कमी करतायेत त्यावर भाजपा नेते बोलत नाही, मुंबई ओरबडायची असेल तर त्याला आमचा विरोध आहे, १०० पिढ्या आल्या तरी मुंबई महापालिकेवर भगवा उतरवायचं सोडा पण हात लावण्याचीही हिंमत नाही नाही, कारण या भगव्यात आग आहे असं संजय राऊत म्हणाले होते.
 

 

Web Title: bjp leader chandrakant patil clears parties stand over alliance with mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.