BJP Gopal Shetty Letter to CM Uddhav Thackeray over Recommend BharatRatna of Savarkar to the Center | “स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव विधिमंडळात पारित करून केंद्राला शिफारस करा”

“स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव विधिमंडळात पारित करून केंद्राला शिफारस करा”

मनोहर कुंभेजकर

मुंबई : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरिता ज्या शूरवीरांनी आपले सर्वस्व भारत मातेच्या चरणी अर्पण करून व जीवनातील सर्वसुखाचा त्याग करून ब्रिटिशांपूढे नतमस्तक न होता संघर्ष केला. त्या शूरवीरांमध्ये ब्रिटिशांनी दिलेली काळ्यापाण्याची शिक्षा भोगून भारतीयांना मातृभूमीच्या प्रेमाची ज्वलंत विचारधारा देणारे व क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहेत. स्वातंत्र्यवीर  सावरकरांना मरणोत्तर ''भारतरत्न'' प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र विधानमंडळात ठराव संमत करून केंद्र शासनाला शिफारस करण्याची मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत समस्त भारतीयांच्या मनात असलेला आदर व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान सर्व भारतीयांना ज्ञात आहे. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत आपल्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यवीर सावरकरांना  मरणोत्तर "भारतरत्न"  देण्याबाबतचा ठराव महाराष्ट्र विधानमंडळात विद्यमान सत्रात प्राधान्याने आणून व संमत  करून केंद्र शासनाकडे तातडीने पाठविण्यात यावा,  विधानमंडळातील सर्व पक्षीय  सदस्यांकडून या प्रस्तावास निश्चितच समर्थन मिळेल याबाबत दुमत नाही असे देखिल त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

स्वातंत्र्यवीर  सावरकरांना मरणोत्तर "भारतरत्न" प्रदान करण्याबाबत राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस करण्याबाबतचा  अशासकीय ठराव  आपण आमदार असतांना विधी मंडळाच्या जुलै २००७ च्या पावसाळी सत्रात  दिनांक १६ जुलै,  २००७ व नोव्हेंबर ,२००७ च्या  हिवाळी सत्रात दि  १९, ११, २००७ रोजी विधानसभेत मांडला होता याची प्रत सुद्धा खासदार शेट्टी यांनी पत्रात नमूद केली होती.

 सदर विषय अत्यंत संवेदनशील असून समस्त भारतीयांच्या देशाभिमानाशी निगडित आहे . आपणही या भावनेशी समरस आहात याची मला कल्पना आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला होता.  हिंदुत्वाच्या मूळ पायावर उभ्या राहिलेल्या  पक्षाचे आपण प्रमुख असून योगायोगाने राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची आपणास सुवर्णसंधी लाभली आहे.  या संधीचा फायदा घेऊन जनमाणसातील आपला माणूस म्हणून मानाचे स्थान असलेल्या शिवसेनाप्रमुखांचे अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानमंडळात ठराव करून तशी शिफारस केंद्र शासनाकडे पाठविण्यात आपण अग्रणी रहावे.त्यामुळे ती स्वर्गीय बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असे खासदार शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.

 राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या  ठरावावरील चर्चेला विधानमंडळात उत्तर देताना आपण या विषयाचा उल्लेख केला आहे.  तसेच, सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीच्यावतीने शिवसेनेने सभागृहात ठराव मांडला तर जनभावनेच्या बाजूने त्याबाबत काँग्रेसची भूमिका राहील असे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार  नाना पटोले यांची नुकतेच वक्तव्य केले असल्याची बाब निदर्शनास आली आहे असे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रात नमूद केले आहे.

 

Web Title: BJP Gopal Shetty Letter to CM Uddhav Thackeray over Recommend BharatRatna of Savarkar to the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.