Bihar Election 2020: ‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:45 AM2020-10-12T01:45:13+5:302020-10-12T01:45:35+5:30

पाच पक्षांनी एकत्र येत बनवला फ्रंट, नव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे.

Bihar Election 2020: Experimenting ‘Deprived’ through ‘GDSF’; Politics of Dalit and Muslim views in Bihar | Bihar Election 2020: ‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारण

Bihar Election 2020: ‘जीडीएसएफ’च्या माध्यमातून ‘वंचित’चा प्रयोग; बिहारमध्ये दलित व मुस्लिम मतांचे राजकारण

Next

असीफ कुरणे 

कोल्हापूर : बिहारच्या राजकारणात दलित, महादलित व मुस्लिम मतांना फार महत्त्व असून, या मतांच्या बळावरच एमआयएम, बसपा आणि आरएलएसपीसारख्या पक्षांनी एकत्र येत नवी आघाडी उघडली आहे. या पक्षांनी निवडणुकीसाठी ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट (जीडीएसएफ) नावाची आघाडी स्थापन करीत मैदानात आव्हान उभे केले आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या वंचित बहुजन आघाडीसारखा हा प्रयोग ठरू शकतो. या फ्रंटने सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटात चिंता वाढवली असून, याचा नेमका फटका कोणाला बसणार, हे निकालानंतरच कळेल.

बिहारमधील दलित आणि मुस्लिम मते एकगठ्ठा खेचण्यासाठी मायावती (बहुजन समाज पार्टी) खासदार असदोद्दीन ओवेसी (एमआयएम), उपेंद्रसिंह कुशवाह (राष्ट्रीय लोक समता पार्टी) यांनी जनतांत्रिक पार्टी, समाजवादी जनता दलसह ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट तयार केला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात असदोद्दीन ओवेसी आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग करीत अनेकांची गणिते बिघडवली होती. जवळपास १३ लोकसभा जागांवर वंचितच्या उमेदवारांनी दखलपात्र मते घेतली होती. अशाच पद्धतीने बिहारमध्ये दलित, मुस्लिम मते एकत्र करीत त्यांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न सुरू आहे. बिहारमध्ये जवळपास १६ टक्के दलित मते, तर १७ टक्के मुस्लिम मते आहेत, तर १४ टक्के यादव मते आहेत. याच दलित, मुस्लिम मतांवर जीडीएसएफचा डोळा आहे. २०१५ च्या निवडणुकीतदेखील एमआयएमने मुस्लिम मतांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांना बिहारी मतदारांनी नाकारले होते. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमधील एमआयएमच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती. बसपाचा बिहारमध्ये फारसा मतदार नाही; पण उत्तर प्रदेशाला लागून असलेल्या मतदारासंघामधील दलित मतदारांवर मायावतींचा प्रभाव दिसतो.

सत्ताधारी, विरोधकांना धाकधूक
नव्याने आकारास आलेल्या ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंटची जनता दल (स) आणि राष्ट्रीय जनता दल यांना जास्त काळजी लागली आहे. कारण दलित समाजातील अनेक जाती या नितीश कुमार यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे मागील निकालातून दिसले आहे, तर राष्ट्रीय जनता दलाला मुस्लिम मतदार पसंती दर्शवतात. जीडीएसएफच्या उमेदवारांना दलित, मुस्लिम मतदाराने साथ दिली, तर सत्ताधारी व विरोधकांना थेट फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळेच जीडीएसएफचे उमेदवार किती आणि कोणाची मते खातात, यावर सत्तेचा तराजू कोणाकडे झुकणार हे दिसेल.

Web Title: Bihar Election 2020: Experimenting ‘Deprived’ through ‘GDSF’; Politics of Dalit and Muslim views in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.