मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप     

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 05:15 PM2021-02-05T17:15:33+5:302021-02-05T17:16:34+5:30

Balasaheb Thorat : या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारीला देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Balasaheb Thorat's allegation that India is not in the world due to Modi government's bigotry | मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप     

मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की, बाळासाहेब थोरातांचा आरोप     

Next
ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुंबई : कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारीला देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु केंद्रातील भाजपाचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत त्यामुळेच ते रद्द करावेत ही मागणी लावून धरत महाराष्ट्रासह देशभर आंदोलन करुन काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहे. कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचे केवळ नाटक करत आहे, असे टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभर नाचक्की होत आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Web Title: Balasaheb Thorat's allegation that India is not in the world due to Modi government's bigotry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.