“हा तर MPSC चा आवडता उद्योग, दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा”; अमित ठाकरेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 11:30 PM2021-07-04T23:30:01+5:302021-07-04T23:32:02+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी MPSC वर निशाणा साधला आहे.

amit thackeray criticised mpsc on student suicide in pune | “हा तर MPSC चा आवडता उद्योग, दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा”; अमित ठाकरेंनी सुनावले

“हा तर MPSC चा आवडता उद्योग, दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा”; अमित ठाकरेंनी सुनावले

Next
ठळक मुद्देराजपुत्र व मनसे नेते अमित ठाकरे यांचा MPSC निशाणाहुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळतोय - अमित ठाकरे'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा - अमित ठाकरे

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता अनेक स्तरांतून MPSC आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात येत आहे. यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी MPSC वर निशाणा साधला आहे. परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत, असा टोला लगावत अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. (amit thackeray criticised mpsc on student suicide in pune) 

MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव आहे. अथक परिश्रम घेऊन त्याने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे समोर आले. याप्रकरणी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत या प्रकरणावर परखड शब्दांत भाष्य केले आहे. 

“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

अवघा महाराष्ट्र हळहळत आहे

'एमपीएससी'ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणारा स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर 'एमपीएससी हे मायाजाल आहे' असं म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे अमित ठाकरे म्हणाले. 

ED कारवाईपासून संरक्षण द्या; अनिल देशमुखांची सुप्रीम कोर्टात धाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग

परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत आणि त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच 'एमपीएससी' परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे. स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला 'दिरंगाईचा खेळ' कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा, असे अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. 

“फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते”; केंद्रीय मंत्र्याचे सूचक विधान

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. स्वप्नीलप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट पाहत आहे का, असा सवाल पडळकर यांनी केला. येत्या आठ दिवसांत एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देत सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही पडळकरांनी केली आहे.
 

Web Title: amit thackeray criticised mpsc on student suicide in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.