पिंपरी-चिंचवड शहरात बिगारी महिला बनल्या गवंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 06:16 PM2020-06-30T18:16:37+5:302020-06-30T18:22:42+5:30

कुशल बांधकाम कारागीर म्हणून काम करण्यास प्रारंभ

women become construction filed in Pimpri-Chinchwad! | पिंपरी-चिंचवड शहरात बिगारी महिला बनल्या गवंडी!

पिंपरी-चिंचवड शहरात बिगारी महिला बनल्या गवंडी!

googlenewsNext
ठळक मुद्दे९० मजुरांना प्रशिक्षण : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही ठिकाणी बांधकाम सुरू

नारायण बडगुजर 
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ६० हजारांवर बांधकाम मजूर आहेत. यात २५ हजार महिला आहेत. त्या सर्व महिला बिगारी म्हणून काम करतात. मात्र, यातील ९० महिलांनी बांधकामाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्या आता गवंडी म्हणून कुशल बांधकाम कारागिराचे काम करणार आहेत. आम्हाला आतापर्यंत कामावर ए बाई, असे म्हणून हाक मारत होते. मिस्त्री म्हणा, असे आम्ही आता त्यांना सांगतो, असे या महिला म्हणतात.    
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर काही ठिकाणी बांधकाम सुरू झाले आहे. याचा सदुपयोग करून घेत ९० महिलांनी बांधकामाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यासाठी कामावर दीड तास जास्तीचे काम करून त्यांनी बांधकाम शिकून घेतले. बांधकामातील माहिती होतीच. कारागिर म्हणून काय कौशल्य असावे, याबाबत त्यांनी समजून घेतले. बांधकाम कामगार सेनेचे जयंत शिंदे यांनी त्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

स्वतंत्रपणे काम
पहिल्या टप्प्यात या महिलांना प्लास्टर, विटांचे बांधकाम, पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार या महिला स्वतंत्रपणे गवंडी म्हणून सध्या काम करीत आहेत. प्लास्टर करताना भिंतींचे कोपरे, त्याची फिनिशिंग करणे, त्यासाठी थापी व ओळंब्याचा कुशलतेने वापर करण्याची कला त्यांनी अवगत केली. त्यामुळे या महिला कारागीर कुशलतेने त्यांची कामे करीत आहेत. 

बिगारी म्हणून दिवसाला ४०० रुपये मिळायचे. मी बांधकाम शिकून घेतले. आता दिवसात दीड ब्रास बांधकाम करते. त्यामुळे आता ९०० रुपये दिवसाला मिळतात. यातून मुलाबाळांचे चांगले संगोपन करणे शक्य होणार आहे.    
- व्यंकम्मा संपगी, मूळगाव नाशिक

मी पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे प्रशिक्षण घेतले. यापूर्वी मिस्त्री काम करण्याची भीती वाटायची. आधी  अवघडल्यासारखे व्हायचे. आता आत्मविश्वासाने काम करते. दिवसाला १२०० रुपये मोबदला मिळतो. 
- भाग्यश्री आडवी, मूळगाव लातूर

Web Title: women become construction filed in Pimpri-Chinchwad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.