सीमेवरील तणावामुळे चीनची गुंतवणूक अडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 01:55 AM2021-01-12T01:55:36+5:302021-01-12T01:56:00+5:30

परवानगीची प्रतीक्षा : चार हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव

Tensions on the border hampered Chinese investment | सीमेवरील तणावामुळे चीनची गुंतवणूक अडकली

सीमेवरील तणावामुळे चीनची गुंतवणूक अडकली

Next

विशाल शिर्के

पिंपरी : भारत आणि चीनमध्ये सीमेवर झालेल्या तणावाचा फटका देशातील गुंतवणुकीवर बसण्याची दाट शक्यता आहे. चीनमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात दिलेल्या गुंतवणूक प्रस्तावाला केंद्र सरकारने अद्याप परवानगी दिली नसल्याने राज्यातील तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव मार्गी लागू शकले नाहीत.

राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत जून, नोव्हेंबर आणि डिसेंबर-२०२० मध्ये ५४ कंपन्यांशी गुंतवणुकीचे करार केले आहेत. त्यातील २९ करार जून आणि नोव्हेंबर महिन्यांत करण्यात आले आहेत. यातील १५ कंपन्या या परदेशी आहेत. या कंपन्यांची गुंतवणूक २२,००२ कोटी रुपयांची आहे. सिंगापूर, अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन, स्पेन आणि चीन या देशांमधील या कंपन्या आहेत. 
परदेशी गुंतवणुकीपैकी सर्वाधिक सहा कंपन्या सिंगापूरमधील असून, खालोखाल चीनमधील तीन कंपन्या आहेत. गुंतवणुकीतही सिंगापूर खालोखाल चीनमधील कंपन्यांचीच गुंतवणूक अधिक आहे. राज्य सरकारने उद्योगांना आकर्षित करण्यासाठी लाल कार्पेट अंथरले आहे. त्यांना सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाव्यात यासाठी पुण्यामध्ये पहिल्या विभागीय कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. तसेच पंधरा कंपन्यांपैकी केवळ तीन कंपन्यांचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. त्यापैकी दक्षिण कोरियाच्या कंपनीने कोविडमुळे रांजणगाव येथील आपला प्रकल्प तात्पुरता स्थगित केला आहे. कोविडमुळे कोरियाच्या इस्टेक कंपनीच्या प्रतिनिधींना प्रकल्पाची जागा पाहता आली नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे.

चीनच्या फोटॉन, ग्रेटवॉल मोटर्स या कंपन्या ऑटोमोबाईलमध्ये, तर हेंगली ही कंपनी अभियांत्रिकीमध्ये गुंतवणूक करणार आहेत. त्यातील फोटॉन कंपनी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी कंपनीशी भागीदारीमध्ये पुण्यातील तळेगाव येथे एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यातून दीड हजार रोजगार निर्मिती होणार आहे. तर ग्रेटवॉल मोटर्स आणि हेंगली या चीनमधील कंपन्यांकडून थेट ४ हजार २० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पडून आहे. थेट परकीय गुंतवणुकीअंतर्गत त्याला केंद्र सरकारची परवानगी आवश्यक आहे. केवळ चीनमधून करण्यात येणाऱ्या थेट गुंतवणुकीला अजून परवानगी दिलेली नाही. हा केंद्राच्या आखत्यारित विषय असल्याचे राज्याच्या उद्योग विभागातील सूत्रांनी सांगितले. गेल्यावर्षी भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण होते. त्यामुळे चीन विरोधात संतापाची लाट पसरली होती. 

या कंपन्यांची 
रखडली परवानगी
n थेट परकीय गुंतवणुकीअंतर्गत
चीनच्या कंपन्यांची परवानगी
रखडली
n ग्रेटवॉल(ऑटोमोबाईल) तळेगाव, 
पुणे ३७७० कोटी २०४२ रोजगार
n हेंगली (अभियांत्रिकी) तळेगाव-
पुणे २५० कोटी २५० रोजगार

देश    कंपनी     गुंतवणूक
    संख्या     कोटींमध्ये
सिंगापूर    ६    ९९७० 
चीन    ३    ५०२० 
जपान    २    ६०७ 
अमेरिका    १    ७६० 
दक्षिण कोरिया    १    १२० 
ब्रिटन    १    ४४०० 
स्पेन    १    ११२५ 

Web Title: Tensions on the border hampered Chinese investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.