पोलीसदादा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? पोलिस विभागाला वाहनचालकांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:56 PM2022-01-18T19:56:16+5:302022-01-18T19:58:54+5:30

केवळ ९८ वाहनचालक असल्याने वाहने चालवायला ड्रायव्हर आणायचे कोठून, असा प्रश्न आहे

policeman driver license pimpri chinchwad police needed driver | पोलीसदादा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? पोलिस विभागाला वाहनचालकांची कमतरता

पोलीसदादा, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? पोलिस विभागाला वाहनचालकांची कमतरता

Next

नारायण बडगुजर

पिंपरी : शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले तरी पुरेशा साधनसामुग्री व मनुष्यबळाअभावी आयुक्तालयाचा गाडा हाकताना प्रशासनाची दमछाक होत आहे. त्यात केवळ ९८ वाहनचालक असल्याने वाहने चालवायला ड्रायव्हर आणायचे कोठून, असा प्रश्न आहे. याबाबत ‘लोकमत’ने ९ जानेवारीला सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, याची विचारणा करायला सुरुवात केली. त्याबाबत पोलीस ठाणे व सर्वच शाखांना सूचना देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांततर्गत १८ पोलीस ठाणे आहेत. तसेच गुन्हे शाखेची विविध पथके आहेत. आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वाहनांची आवश्यकता आहे. आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाली. मात्र त्यासाठी वाहनचालक उपलब्ध झाले नाहीत. परिणामी पोलिसांची कसरत होत आहे. आरोपी पकडण्यसाठी जाताना, आरोपींना न्यायालय, रुग्णालय, तुरुंग आदी ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनचालक उपलब्ध होत नाही. तसेच विविध कारवायांसाठी जातानाही हीच अडचण येते. परिणामी पोलिसांच्या कामकाजावर परिणाम होत आहे.

वाहन तसेच वाहनचालक उपलब्ध होत नसल्याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर आयुक्तालय प्रशासनाने आयुक्तालयांतर्गत उपलब्ध कर्मचाऱ्यांमधून वाहनचालक उपलब्ध करून देण्यास हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी आयुक्तालयांतर्गत किती पोलीस कर्मचाऱ्यांकडे चारचाकी व अजवड वाहन चालविण्याचा परवाना आहे, याची माहिती मागविण्यात आली आहे. याबाबत सर्वच पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात आली आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहन चालविण्याचा परवाना घेतला असेल तसेच आयुक्तालयाच्या मोटार वाहन विभागाकडून प्रशिक्षण घेतले आहे, अशा कर्मचाऱ्यांची नावे तसेच इतर माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

पोलीस कर्मचाऱ्यांची ‘ना’
वाहन चालविण्याचा परवाना असला तरी, असे पोलीस कर्मचारी त्याबाबत माहिती देण्यास उत्सूक नाहीत. वाहनचालक म्हणून काम करणे पसंत नसल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद नाही. त्यामुळे पोलीस आयुक्तालय प्रशासनाची कसरत आहे.

दुष्काळात तेरावा...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सध्या ३४५ अधिकारी व २९३० कर्मचारी, असे एकूण ३२७५ मनुष्यबळ आहे. शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळ उपबल्ध व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र अद्याप पुरेसे मनुष्यबळ उपबल्ध झालेले नाही. अपुऱ्या मनुष्यबळावर आयुक्तालयाचा गाडा हाकावा लागत आहे. त्यामुळे अनेक गुन्हे प्रलंबित असून कामकाजाचा ताण आहे. सध्याच्या कर्मचाऱ्यांमधूनच वाहनचालक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलीस ठाण्यांच्या तसेच इतर विविध पथकांतील कामकाजावर परिणाम होणार आहे.    

शहर पोलीस दलातील परिस्थिती...
सध्या उपलब्ध वाहनचालक - ९८
आवश्यक वाहनचालक - २७७
वाहनचालकांची रिक्त पदे - १७९
किती वाहनचालकांचा प्रस्ताव - ३३८

अशी आहे वाहनांची आकडेवारी....
अनुदेयनुसार चारचाकी - २२३
अनुदेयनुसार दुचाकी - १४३
उपलब्ध चारचाकी - १२६
उपलब्ध दुचाकी – ११०

Web Title: policeman driver license pimpri chinchwad police needed driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.