Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन

By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 20:33 IST2025-06-15T20:29:03+5:302025-06-15T20:33:46+5:30

- अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय, सोशल मीडियावर अपघाताविषयी हळहळ; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

PM Modi, Home Minister Shah express grief over bridge accident | Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन

Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन

पिंपरी : कुंडमळा येथे साकव पूल कोसळून झालेल्या अपघाताबद्दल सोशल मीडियावर नागरिक, नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे, हळहळ व्यक्त केली आहे. तर प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.  “अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय,” अशी टीका केली आहे. तर  पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्ह्यातील पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गृहमंत्री अमित शाहांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पूल दुर्घटनेची माहिती घेतली आहे.  

मावळातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुपारी तीनच्या सुमारास कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला. अजूनही आकडा निश्चित नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. सोशल मीडियावरून घटनेची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात असून विविध सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नेटकऱ्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे.  

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, “पूल गिरने की घटना से दुखी हूं.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे जिल्ह्यातील पूल दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधून घटनेविषयी चर्चा केली. अमित शहा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे – “पूल गिरने की घटना से दुखी हूं. पीड़ित परिवार के प्रति संवेदना. घायलों के जल्दी ठीक होने की कामना,” अशी संवेदना शहा यांनी व्यक्त केली आहे.

माजी सनदी अधिकारी महेश झगडे म्हणाले, “इंद्रायणी पूल कोसळला. मी पुन्हा सांगतोय, अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय.”

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अबू आझमी म्हणाले, “पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मावळमधील एक पूल कोसळून अनेक जणांचा जीव गेला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली आणि जखमी झालेले नागरिक, पर्यटक लवकरच बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना. नदीत अडकलेल्यांना तातडीने मदत द्यावी.”

नागरिक नासिर शेख म्हणाले, “घरातून बाहेर पडताना आपल्या आपल्या जबाबदारीने बाहेर पडा. सर्व ठिकाणी डबल इंजिन सरकारचे महाविकास होत आहे. जसे पूल, रेल्वे, रस्ते, विमान, मेट्रो बस यांचे कधी काय होईल, सांगता येत नाही.”

नागरिक प्रदीप थत्ते म्हणाले, “हे सगळं इंस्टाग्रामच्या इन्फ्लुएन्सर मुले-मुलींनी या ब्रिजवर उभे राहून इतक्या रिल्स टाकल्या की, सगळी गर्दी वाढली तिथे. हा पूल जुना आहे, गावातले लोक नेहमी सांगत असत — त्यावर जास्त गर्दी करू नका. पण नाही, लोक उलट दुचाकी गाड्या घेऊन घुसत होते. आगाऊपणा नडत आहे. अशाच घटना दरवर्षी भुशी डॅमलाही घडतात.”

अजिंक्य आयरेकर म्हणाले, “उत्साहातून लोकांकडून होणारी निष्काळजीपणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय दुर्लक्ष. असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत. आता प्रशासकीय नाटक, दोषारोपाचा खेळ सामान्य लोकांचे जीव घेतल्यानंतर सुरू होईल. सार्वजनिक ठिकाणी बारकाईने लक्ष नाही, नियोजन नाही आणि सार्वजनिक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.”

आनंद झांबरे म्हणाले, “मृत्यू हा स्वस्त झाला आहे. याच्याशी कुणाला काही देणं-घेणं नाही. फक्त राजकारण आणि भ्रष्टाचार. तो भाऊ आला जवळ आणि हा भाऊ जवळ आला — यामध्येच आपण आहोत. जोपर्यंत आपण स्वतःहून सुधारणार नाही, या गोष्टी चालतच राहणार.”

कुणाल चौधरी म्हणाले, “पुण्यात पूल कोसळला, केदारनाथ येथे हेलिकॉप्टरची दुर्घटना झाली, गुजरातमध्ये विमान अपघात झाला. हे काय होत आहे? हा भाजपाचा असली चेहरा आहे का? जिथे मृत्यू इतका स्वस्त झाला आहे, जिथे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत, याबाबत सरकारला काहीही चिंता नाही. हे दुर्दैव आहे.”

अनिकेत कुमार अवस्थी म्हणाले, “अपघातांचा सिलसिला कमी होत नाही. इंद्रायणी नदीवरील पूल पडून झालेल्या अपघातात अनेक जण अडकले आहेत. त्यांना तातडीने मदतकार्य देणे गरजेचे आहे.”

Web Title: PM Modi, Home Minister Shah express grief over bridge accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.