मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सह दुय्यम निबंधक रवींद्र तारूला आठ दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:45 IST2025-12-09T15:41:37+5:302025-12-09T15:45:08+5:30
Mundhwa Land Deal Case: मुंढवा जमीन व्यवहारात अनियमितता व मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा पाेलिसांना संशय

मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: सह दुय्यम निबंधक रवींद्र तारूला आठ दिवसांची पोलिस कोठडी
पिंपरी : पुण्यातील मुंढवा येथील ४० हेक्टर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात दस्त नोंदणी करणाऱ्या सह दुय्यम निबंधकाला बावधन पोलिसांनी रविवारी (दि. ७) अटक केल्यानंतर सोमवारी (दि. ८) पौड न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
रवींद्र बाळकृष्ण तारू (वय ५८, रा. भोर) असे पोलिस कोठडी सुनावलेल्या सह दुय्यम निबंधकाचे नाव आहे. याप्रकरणी सह जिल्हा निबंधक वर्ग १ अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यारपत्र असलेली महिला शीतल तेजवानी आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. जमीन व्यवहार प्रकरणी पुणे शहर पोलिसांकडे दाखल गुन्ह्यात शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
बावधन पोलिसांनी सोमवारी तारू याला पौड न्यायालयात हजर केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी तारू याला दहा दिवस पोलिस कोठडीची मागणी केली. इतर संशयितांनी जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदाराचे नाव ‘मुंबई सरकार’ असल्याचे माहिती असतानाही व आवश्यक शासन परवानगी न घेता व्यवहार केला. संशयितांनी संगनमत करून शासनाला देय असलेले सुमारे सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केली.
संशयितांनी दस्त नोंदणी करताना सादर केलेला सातबारा बंद असताना तसेच शीतल तेजवानी हिच्याकडे मालकी हक्काबाबत कोणतीही खात्री न करता तारू याने दस्त नोंदणी केली. ‘मुंबई सरकार’ या नोंदीकडे दुर्लक्ष करून महसूल विभागाकडील ‘आय सरिता’ या ऑनलाइन संगणक प्रणालीमध्ये स्किप हा पर्याय वापरून तारू याने दस्त कोणाच्या सांगण्यावरून नोंदवला आणि या प्रणालीद्वारे कसा नोंदवला त्याबाबत तपास करायचा आहे, असे विविध मुद्दे मांडत बावधन पोलिसांनी तारू याला दहा दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने तारू याला आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.