सप्तश्रृंगी गडावर कार दरीमध्ये कोसळून निगडी प्राधिकरणातील दाम्पत्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:19 IST2025-12-09T16:19:47+5:302025-12-09T16:19:58+5:30
नातवाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या पटेल कुटुंबातील मुलगी-जावईही ठार

सप्तश्रृंगी गडावर कार दरीमध्ये कोसळून निगडी प्राधिकरणातील दाम्पत्याचा मृत्यू
पिंपरी : नातवाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या निगडी प्राधिकरणातील पटेल दाम्पत्याचा नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंग गडावरून परत येताना दरीत मोटार कोसळून मृत्यू झाला. रविवारी (७ डिसेंबर) झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले असून, त्यात पटेल यांच्या मुलगी-जावयाचाही समावेश आहे. दाम्पत्यावर निगडी येथील स्मशानभूमीत सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
पचन करमसी पटेल (वय ७२) आणि मणिबेन पचन पटेल (७०, दोघेही रा. प्राधिकरण निगडी), त्यांची मुलगी रसिला कीर्ती पटेल (४९), त्यांचे पती कीर्ती गोपाल पटेल (५०, दोघेही रा. पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक), विठ्ठल पटेल (६५) आणि लता पटेल (६०) अशी मृतांची नावे आहेत.
रसिला आणि कीर्ती पटेल यांच्या मुलाचे १२ नोव्हेंबर रोजी लग्न झाले. नातवाच्या लग्नासाठी पचन आणि मणिबेन पटेल मुलीकडे गेले होते. नंतर देवदर्शनासाठी निघाले. रविवारी सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्यासोबतचे काही जण दुसऱ्या मोटारीतून पिंपळगाव बसवंत येथे घरी गेले. त्यानंतर कीर्ती पटेल यांच्यासह सहाजण सप्तश्रृंगगडावर दर्शनासाठी गेले. तेथून परत येताना पाचशे फूट खोल दरीत मोटार कोसळली. निगडी प्राधिकरणातील पाटीदार भवन येथे बुधवारी (१० डिसेंबर) सायंकाळी चार वाजता प्रार्थना सभा आहे.
जेवणासाठी थांबल्यावर काढला फोटो...
देवदर्शनासाठी प्रवास करताना पटेल कुटुंबीय हाॅटेलमध्ये जेवणासाठी थांबले. त्यावेळी त्यांनी फोटो काढला. हा त्यांचा एकत्रित अखेरचा फोटो ठरला.
माझी सून येणार आहे, आई तू थांब...
माझ्या मुलाचे लग्न झाले आहे, नवीन सून घरी येणार आहे. त्यासाठी तू थांब, असे म्हणत रसिला यांनी आई मणिबेन यांना पिंपळगाव बसवंत येथे थांबवून घेतले होते.
‘तो’ फोन काॅल ठरला अखेरचा...
पचन आणि मणिबेन यांचे मुलगा महेश यांच्याशी रविवारी सकाळी आठच्या सुमारास फोनवरून बाेलणे झाले. देवदर्शनासाठी जाऊन पुण्याला परत येऊ, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी पटेल दाम्पत्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजले आणि महेश यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
मुलाला व्यवसायात मदत
पटेल कुटुंबीयांचे कासारवाडी येथे हार्डवेअर, प्लायवूडचे दुकान आहे. पचन पटेल या दुकानात मुलगा महेश यांना मदत करत होते.