दापोडी ते निगडी ग्रेड सेपरेटरमध्ये जीवघेणे खड्डे;देखभालीसाठी कोटीची निविदा तरी रस्ता दुरुस्त होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 16:15 IST2025-12-09T16:15:14+5:302025-12-09T16:15:47+5:30
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील विनाअडथळा मार्गाची दुरवस्था, वाहनांच्या रांगा, , महापालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? वाहनचालकांचा संतप्त सवाल

दापोडी ते निगडी ग्रेड सेपरेटरमध्ये जीवघेणे खड्डे;देखभालीसाठी कोटीची निविदा तरी रस्ता दुरुस्त होईना
- रवींद्र जगधने
पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील दापोडी ते निगडी दरम्यानच्या समतल विलगकामध्ये (ग्रेड सेपरेटर) ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, डांबराचा थरही निघून गेला आहे. त्यामुळे वाहतूक मंदावत असून, खड्ड्यांत वाहने जोरात आदळत आहेत. परिणामी, अपघात व वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी एक कोटींची निविदा काढली असतानाही ठेकेदाराकडून दुरुस्ती होत नसल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. या महामार्गावरून दापोडीपासून निगडीपर्यंत विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी २००८ मध्ये साडेबारा किलोमीटरचा समतल विलगक तयार करण्यात आला. यामुळे दापोडी, नाशिक फाटा चौक वगळता सिग्नलविरहित सुसाट जाता येते. मात्र, दापोडी ते वल्लभनगर दरम्यान सिमेंट काँक्रीटच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. या भेगा मेट्रोच्या कामामुळे पडल्या असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
खड्ड्यात वाहने जोरात आदळतात
महापालिकेच्या इमारतीसमोर समतल विलगकामध्ये मोठे खड्डे पडले असून, डांबराचा थरही निघून गेला आहे. तात्पुरत्या दुरुस्तीसाठी बसवलेले पेव्हिंग ब्लॉकही खचले आहेत. पुण्याकडून वेगात येणारी वाहने या खड्ड्यांत आदळतात, तर काही वाहने अचानक वेग कमी करतात. त्यामुळे मागून येणारी वाहने एकमेकांना धडकतात. वाहतूक मंदावल्यामुळे खराळवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. अनेक महिन्यांपासून येथील खड्ड्यांवर केवळ मलमपट्टी केली जात आहे.
एक कोटीची निविदा कशासाठी?
या संपूर्ण समतल विलगकाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुमारे एक कोटी आठ लाखांची निविदा काढून ठेकेदार नियुक्त केला आहे. मात्र खड्डे, भेगा, खचलेले चेंबर, निघून गेलेले डांबर यांची दुरुस्तीच केली जात नाही. सिमेंट काँक्रीटच्या मार्गावरील काही भेगांवर डांबराचे पॅच मारण्यात आले आहेत. तेही काही ठिकाणी उखडले आहेत. समतल विलगकाची एवढी दुरवस्था झालेली असताना महापालिका अधिकारी मात्र डोळेझाक करत आहेत.
समतल विलगकाची जबाबदारी विभागली
समतल विलगकाची जबाबदारी महापालिकेच्या दोन विभागांकडे विभागून देण्यात आली आहे. समतल विलगकावरील पूल व त्याखालील भाग प्रकल्प विभागाकडे, तर उर्वरित मार्ग शहरी दळणवळण विभागाकडे आहे.
चिंचवडमध्ये चेंबर खचले, डांबर गायब
चिंचवड येथे समतल विलगकात पुलाखालील डांबराचे थर निघून गेले आहेत. त्यामुळे वेगात येणारी वाहने विचलित होत आहेत. अनेकांचे नियंत्रणही सुटते. येथे चेंबर खचले असून, डांबरीकरण केल्यानंतर चेंबर रस्त्याच्या समांतर ठेवण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही.
मेट्रोचे स्तंभ उभारताना मोठ्या आकाराचे खोदकाम करण्यात आले. त्यामुळे समतल विलगकातील काँक्रीटच्या रस्त्याला तडे गेले. मेट्रोने स्तंभाजवळील दुरुस्ती केली. मात्र, त्या लगतचा खराब झालेला भाग दुरुस्त केलेला नाही. तो करण्याबाबत मेट्रो प्रशासनाला कळविण्यात आले आहे. - बापू गायकवाड, संयुक्त शहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, महापालिका
पुणे ग्रँड सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील काम समतल विलगकात येत्या गुरुवारी रात्री होणार आहे. रात्री वाहने वेगात असतात, त्यामुळे या मार्गातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. अगोदर तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली. आता डांबरीकरण करण्यात येणार आहे. - विजय भोजने, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग, महापालिका