पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेसाठी नागरिकांना देणार बंदूक परवाना : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 12:01 PM2020-09-23T12:01:01+5:302020-09-23T12:03:19+5:30

माझे शहर, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी, या अनुषंगाने गस्तीसाठी थेट नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार

To give gun license to citizens for security of Pimpri-Chinchwad: Commissioner of Police Krishna Prakash | पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेसाठी नागरिकांना देणार बंदूक परवाना : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 

पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेसाठी नागरिकांना देणार बंदूक परवाना : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश 

googlenewsNext
ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळाची समस्याशहरात मोहल्ला सुरक्षा दल तसेच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल म्हणून हे पथक कार्यरत राहणार

नारायण बडगुजर-
पिंपरी : उद्योगनगरीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात नागरिकांचा सहभाग करून घेण्यावर भर देण्यात येत आहे. माझे शहर, माझी सुरक्षा, माझी जबाबदारी, या अनुषंगाने गस्तीसाठी थेट नागरिकांचे सहकार्य घेण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांना बंदुकीचे परवाने देण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय नवीन असल्याने मनुष्यबळाची समस्या आहे. अधिकारी व कर्मचारी पुरेशा संख्येने उपलब्ध होत नसल्याने पोलिसांवर कामाचा ताण आहे. असे असतानाच शहरात ज्वेलर्सची दुकाने फोडून चोरी, घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरी, एटीएम फोडणे, सोनसाखळी चोरी आदी गुन्हे सातत्याने घडत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्रगस्तीवर पोलिसांकडून भर दिला जात आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. त्यासाठी शहरवासीयांची मदत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शहरातील विशिष्ट भागात किंवा परिसरात चोरी आदी गुन्हे घडतात. अशा परिसरातील नागरिकांना बंदुकीचे परवाने पोलिसांकडून देण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत. ज्या नागरिकांवर गुन्हे दाखल नाहीत, तसेच आठवड्यातून एकदा रात्रगस्त घालण्याची तयारी असलेल्या नागरिकांना अर्ज करता येईल. तसेच संबंधित नागरिकाने बंदूक स्वत: खरेदी करणे आवश्यक राहणार आहे. एका भागात किंवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० ते २५ नागरिकांचा ग्रुप तयार केला जाईल. तसेच त्यांचा व्हाटसअप ग्रुप देखील राहील. संबंधित पोलीस ठाणे तसेच पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी हा ग्रुप नियंत्रित करणार आहेत.

शहरातील असुरक्षित ठिकाणे किंवा जेथे सातत्याने गुन्हेगारी कृत्य घडते अशा ठिकाणी बंदूकधारी नागरिकांकडून गस्त घालण्यात येईल. एका रात्रीसाठी किमान दोन नागरिकांचे पथक गस्त घालू शकणार आहे. शहरात मोहल्ला सुरक्षा दल तसेच ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दल म्हणून हे पथक कार्यरत राहणार आहे, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
 
नागरिकांनी सतर्क होण्याबरोबरच शहराच्या सुरक्षेसाठी पुढे आले पाहिजे. स्वत:सह आपला परिसर, शहर सुरक्षित रहावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच नागरिकांची गस्त पथके तयार केली जाणार आहेत.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: To give gun license to citizens for security of Pimpri-Chinchwad: Commissioner of Police Krishna Prakash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.