Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 09:37 IST2025-06-18T09:35:47+5:302025-06-18T09:37:36+5:30

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दिंड्या, लाखो वारकरी देहूनगरीत दाखल

Dehu ready for sant tukaram maharaj palakhi sohala | Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज

देहूगाव : आषाढी वारीच्या निमित्ताने देहूनगरी भक्तिभावात न्हाली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शहर सज्ज झाले आहे. वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. यंदा भाविक आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधांसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.

देहू नगरीतून तुकोबांच्या पालखीचे बुधवारी प्रस्थान होत आहे. वारीचा उत्सव भक्तिरसात न्हाला असून, ‘ज्ञानदेव तुकाराम’चा जयघोष घुमत आहे. मुख्य मंदिराचा कळस फुलांनी सजवला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, येलवाडीतील भागीरथीमाता मंदिर, विठ्ठलनगर व चिंचोली परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक आले आहेत. देहूनगरीत भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा संगम अनुभवायला मिळत आहे.

पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने वारीतील नियमांचे पालन करून मार्गक्रमण करतील, अशा सूचना संबंधित दिंडी चालकांना, मालकांना, फडकऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती सोहळाप्रमुख दिलीपमहाराज मोरे यांनी दिली. पालखी रथासाठी जनरेटर व विद्युत व्यवस्था नव्याने केली आहे. रथाचे ग्रिसिंग व ब्रेक सिस्टिम तपासणी करून घेतली आहे. पोलिसांच्या वाहतूक विभागाने आरटीओकडून पासिंग व तपासणी करून घेण्यात आली आहे.

शहरातील विविध ठिकाणी टॉवर उभारून दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पदपथांवर फ्लडलाइट्स लावण्यात आले आहेत. महावितरणने विद्युतपुरवठा सुरळीत राहील, याची खबरदारी घेतली आहे.

मंदिर परिसराची साफसफाई करण्यासाठी नगरपंचायत व स्वकाम सेवा संस्थेचे स्वयंसेवक काम करीत आहेत, अशी माहिती सोहळा प्रमुख वैभव महाराज मोरे व गणेश महाराज मोरे यांनी दिली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदरमहाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख वैभवमहाराज मोरे, गणेशमहाराज मोरे, विश्वस्त उमेशमहाराज मोरे, लक्ष्मणमहाराज मोरे, विक्रमसिंहमहाराज मोरे आदी उपस्थित होते.

एनडीआरएफची तुकडी

इंद्रायणी नदीच्या घाटावर एनडीआरएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे. नदीकिनारी जीवरक्षकही नेमण्यात आले आहेत. मुख्य मार्गांवर आणि मुक्कामस्थळी एकूण ४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

पोलिसांचा मोठा फौजफाटा

पोलिस यंत्रणेच्या वतीने तीन सहायक पोलिस आयुक्त, १५ पोलिस निरीक्षक, ४३५ पोलिस अंमलदार आणि १३४ होमगार्ड, अशा मोठ्या फौजफाट्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अनगडशहा दर्ग्याजवळ विशेष बंदोबस्त आणि बॅरिकेड्सने गर्दी नियंत्रणात ठेवण्यात येत आहे.

१२०० तात्पुरती स्वच्छतागृहे

नगरपंचायतीच्या वतीने १२०० तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. स्वच्छता आणि पाण्याची उपलब्धता याची नियमित देखरेख केली जात आहे. उघड्या गटारांची सफाई, सांडपाण्याची पाइपलाइन व गटार खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

पाण्यासाठी टँकर आणि अन्नदान

पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेकडून टँकरची सोय करण्यात आली आहे. अधिकृत टँकरवरूनच पाणी घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विविध अन्नदान मंडळांमार्फत हजारो वारकऱ्यांसाठी मोफत अन्नदान सुरू आहे. श्रीसंत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाचे सेवाकार्य बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे.

वाहतूक आणि दर्शन व्यवस्था

वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीएमएल आणि एसटी बससेवेद्वारे आळंदी, मनपाभवन, निगडी आणि देहूरोडकडे जाण्याची सुविधा उपलब्ध आहे. दर्शनासाठी सर्व प्रवेशद्वारांवर धातुशोधक यंत्रे बसवण्यात आली आहेत. दर्शनरांगा शिस्तबद्ध राहाव्यात, यासाठी नियोजनबद्ध मार्ग तयार करण्यात आले आहेत.

आरोग्यसेवा सज्ज

गावातील रुग्णालयांमध्ये खास बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. गाथा मंदिर, मुख्य मंदिर व वैकुंठगमन मंदिर परिसरात बाह्यरुग्ण सेवा सुरू आहे. १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका, कार्डियाक ॲम्बुलन्स व आरोग्य केंद्रांच्या गाड्या सज्ज आहेत.

सेवेकरी, चोपदार दाखल

पालखीसाठी नवीन कपडे, गोंडे, गादी व तक्के खरेदी करून आणले आहेत व ते सेवेकऱ्यांच्या मार्फत पालखीला, अब्दागिरी व गरूडटक्कांना लावण्यात आले आहे. पालखीचे मानाचे भोई तानाजी कळमकर व कांबळे हेही आले आहेत. सेवेकरी, म्हसलेकर, चोपदार नामदेवमहाराज गिराम, देशमुख चोपदार, कानसुलकर चोपदार व अध्यक्ष व पालखी सोहळा प्रमुखांचे चोपदार दाखल झाले आहेत.

Web Title: Dehu ready for sant tukaram maharaj palakhi sohala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.