comissioner interviewed by the student at Krantivir Chapekar Vidya Mandir | क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरमधील विद्यार्थिनीने घेतली आयुक्तांची मुलाखत
क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरमधील विद्यार्थिनीने घेतली आयुक्तांची मुलाखत

पिंपरी : क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरमधील इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुलाखत घेतली. एवढ्या लहान वयात विद्यार्थिनी मुलाखत घेत असल्याचे पाहून आयुक्त मंत्रमुग्ध झाले. 
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, शिक्षण विभागाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह अ‍ॅड. सतीश गोरडे, संचालक अशोक पारखी, गतिराम भोईर, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व शिक्षण मंडळातील पदाधिकारी यांना राखी बांधण्यात आली. इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमात भाग घेतला.
सहावीतील गिरिजा हिस्वनकर या विद्यार्थिनीने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुलाखत घेतली. तिने आपल्या प्रश्नांनी आयुक्तांना मंत्रमुग्ध केले. यामध्ये आपली आवड काय आहे? असा प्रश्न तिने विचारला. त्यावर आयुक्तांनी उत्तर दिले- खेळ, वाचन, शिस्त, सामाजिक कार्य करणे याची आवड आहे. मला शिक्षणाधिकारी व्हायचे आहे, तर मी कसा अभ्यास करावा? हा दुसरा प्रश्न तिने विचारला. 
यावर आयुक्त म्हणाले, शिस्त ही घरापासून असली पाहिजे. आई, वडील, शिक्षक यांची आज्ञा पाळणे व नियमित अभ्यास करणे, अक्षर सुधारणे, अवांतर वाचन करणे, खेळ खेळणे, सकारात्मक विचार ठेवणे, सतत थोर व्यक्तींचा आदर्श समोर ठेवणे, असे वागलात तर तुम्ही नक्की हवे असलेले यश मिळवू शकाल.
शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने, शिक्षिका पुष्पा जाधव, दीपाली नाईक, मंजुषा गोडसे, सुधाकर हांडे, गणेश शिंदे, शामला वाघमारे, सविता पाठक, सुनीता चौधरी, सेवक सुंदर मंडलिक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.


Web Title: comissioner interviewed by the student at Krantivir Chapekar Vidya Mandir
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.