पिंपरीच्या भोसरी पोलिसांची हरियाणात जाऊन कारवाई; एटीएम फोडणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 06:02 PM2021-06-17T18:02:11+5:302021-06-17T18:02:45+5:30

तीन आरोपींना अटक : भोसरीतून चोरले होते २२ लाख ९५ हजार रुपये

Bhosari police of Pimpri go to Haryana and take action; The gang was arrested broke the ATM | पिंपरीच्या भोसरी पोलिसांची हरियाणात जाऊन कारवाई; एटीएम फोडणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

पिंपरीच्या भोसरी पोलिसांची हरियाणात जाऊन कारवाई; एटीएम फोडणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्देपांजरपोळ येथील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, अलार्म अशा बाबींचा अभाव दिसून आला. तसेच एटीएम परिसरात अंधार असून, ते निर्मनुष्य ठिकाणी असल्याचे चोरी करण्याचे टोळीने ठरवले.

पिंपरी: पिंपरीत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका टोळीला भोसरीत एटीएम फोडण्याच्या प्रकरणात पोलिसांनी हरियाणात जाऊन अटक केली आहे. भोसरीतील पांजरपोळ येथे एसबीआय बँकेचे एटीएम फोडून २२ लाख ९५ हजार ६०० रुपये या टोळीने चोरून नेले होते. ९ जून रोजी रात्री साडेदहा ते १० जून रोजी सकाळी साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला असून त्यांचे आणखी तीन साथीदार फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अकरम दीनमोहम्मद खान (वय २३), शौकीन अक्तर खान (वय २४), अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर (वय ४६, तिघेही रा. नुहु (मेवात), हरियाणा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर फरार तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अरविंद विद्याधर भिडे (वय ५८, रा. सहकार नगर, पुणे) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ११) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पांजरपोळ येथे चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून मशीनमधून पैशांच्या चार कॅसेट चोरट्यांनी चोरून नेल्या. यामध्ये २२ लाख ९५ हजार ६०० रुपये रोख रक्कम होती. तसेच त्यांनी ३० हजार रुपयांचे एटीएमचे नुकसान केले असल्याचेही फिर्यादीत नमूद केले होते. अशा प्रकारच्या चोऱ्या हरियाणा व राजस्थानच्या काही भागात होत असल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला. पोलिसांचा संशय खरा ठरला.

हरियाणा येथील एक ट्रक घटनास्थळी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो ट्रक भोसरीमधून हरियाणा येथे जात असताना मोशी टोलनाक्यावर अडवून ताब्यात घेतला. ट्रकचालक अकरम खान याच्याकडे तपास केला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या घटनेत त्याच्या वाट्याला आलेले ३ लाख ७४ हजार ५०० रुपये आणि ऑक्सिजन सिलेंडर जप्त केला. खान याने त्याच्या साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार भोसरी पोलिसांनी थेट हरियाणा गाठून तेथून शौकीन खान व अरसद खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यांच्या वाट्याला आलेले २ लाख ५० हजार रुपये आणि एटीएम मशीन मधील ट्रे पोलिसांनी जप्त केले. फरार असलेल्या आणखी तीन साथीदारांबाबत त्यांनी माहिती दिली.  

हरियाणात रचला प्लॅन

आरोपींनी एटीएम फोडण्याचा नियोजनबद्ध प्लॅन करून त्यात ट्रक चालकाला सामील केले. चोरी करण्याच्या उद्देशाने ही टोळी हरियाणा येथून ५ जूनला पिंपरी -चिंचवडेकडे निघाली. चोरी करताना गॅस कटर करीता गॅस ऑक्सिजन सिलेंडर लागेल म्हणून त्यांनी मंचर येथील नाशिक-पुणे महामार्गाच्या बाजूला असलेल्या सिध्दी हॉस्पिटल समोरील रुग्णवाहिकेतून ६ जूनला मध्यरात्री सिलेंडर चोरला. दोन दिवस या टोळीने भोसरी परिसरातील एटीएमची पाहणी केली. त्यात त्यांना पांजरपोळ येथील एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, अलार्म अशा बाबींचा अभाव दिसून आला. तसेच एटीएम परिसरात अंधार असून, ते निर्मनुष्य ठिकाणी असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे या एटीएममधून पैसे चोरी करण्याचे टोळीने ठरवले. 

Web Title: Bhosari police of Pimpri go to Haryana and take action; The gang was arrested broke the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.