दुचाकीस्वारांनो सावधान! उड्डाणपुलांवर नायलाॅन मांजामुळे अपघाताचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 12:46 PM2022-01-10T12:46:54+5:302022-01-10T12:49:22+5:30

नाशिक फाटा येथे मांजाने गळा कापून २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा ऑक्टोबर २०१८ मध्ये मृत्यू झाला होता...

beware of two wheelers accidents due to nylon kite on flyovers | दुचाकीस्वारांनो सावधान! उड्डाणपुलांवर नायलाॅन मांजामुळे अपघाताचा धोका

दुचाकीस्वारांनो सावधान! उड्डाणपुलांवर नायलाॅन मांजामुळे अपघाताचा धोका

Next

नारायण बडगुजर

पिंपरी : पतंगासाठी वापरण्यात येणारा नायलाॅन मांजा उड्डाणपुलावर अडकून अपघात होत आहेत. यात काही दुचाकीस्वार जखमी होत असून काही जणांना जीव गमावाला लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या.  त्यामुळे दुचाकीस्वारांनी उड्डाणपुलांवरून जाताना सावध राहणे आवश्यक आहे.

पंतग उडवून काही जण मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित करतात. त्यासाठी नायलाॅन मांजाचा वापर केला जातो. मात्र हा मांजा जीवघेणा ठरत आहे. मांजा तुटून झाडे, केबल, इमारती, तसेच उड्डाणपुलांवर अडकतो. त्यात अडकून काही पक्षांना दुखापत होते. तसेच काही पक्षांना जीव गमवावा लागतो. उड्डाणपुलावर अडकलेल्या मांजामुळे गळा कापून काही दुचाकीस्वारांना अपघात होतो. शहरातील बाजारपेठेत ठोक तसेच किरकोळ विक्रेते आहेत. बंदी असलेला चायनिज किंवा नायलॉन मांजा आम्ही विक्री करीत नाहीत, तसेच त्याची साठवणूक किंवा वाहतूक देखील करीत नाहीत, असे यातील काही विक्रेत्यांनी सांगितले.

डॉक्टर तरुणीला गमवावा लागला जीव

नाशिक फाटा येथे मांजाने गळा कापून २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा ऑक्टोबर २०१८ मध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये दापोडी येथे पुणे-मुंबई महामार्गावर मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला होता. मात्र सतर्कतेमुळे दुचाकीस्वार बचावला. तसेच दरवर्षी शेकडो पक्षांना दुखापत होते व काही गतप्राण होतात.  

पोलिसांकडून दोन वर्षांत एकही कारवाई नाही

चायनिज किंवा नायलॉन मांजा शहरात येतो कुठून, असा प्रश्न पक्षीप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बंदी असलेल्या मांजाच्या विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दोन वर्षांत एकही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा विक्रेत्यांचे फावले असून, त्यांना पोलिसांकडूनच ढिल देण्यात आली आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शहरातील या भागातील १५ उड्डाणपुलांवर आहे धोका

- नाशिक फाटा
- दापोडी (सीएमई समोर)
- भोसरीगाव
- भुजबळ चौक, वाकड
- सांगवी फाटा
- जगताप डेअरी चौक
- काळेवाडी फाटा
- डांगे चौक
- चापेकर चौक, चिंचवडगाव
- एम्पायर इस्टेट, चिंचवड
- टिळक चौक, निगडी
- भक्तीशक्ती चौक, निगडी
- स्पाईनरोड, जाधववाडी
- स्पाईनरोड, मोशी
- केएसबी चौक, पिंपरी

नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होऊन दगावतात. मकरसंक्रांतीच्या काळात हे प्रकार जास्त होतात. याला आळा बसला पाहिजे. नागरिकांनी उत्सव साजरा करताना पक्षांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे.
- योगेश कांजवणे, पक्षीप्रेमी, पिंपरीगाव

बंदी असलेल्या मांजाची विक्री, वाहतूक तसेच साठवणूक होत असल्यास कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अशा मांजाची खरेदी करू नये. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई होईल.
डाॅ. काकासाहेब डोळे, पोलीस उपायुक्त

Web Title: beware of two wheelers accidents due to nylon kite on flyovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.