Baba Adhav Passes Away: उद्योगनगरीचा आवाज हरपला...! डॉ. बाबा आढाव यांचे निधन
By विश्वास मोरे | Updated: December 9, 2025 11:54 IST2025-12-09T11:53:55+5:302025-12-09T11:54:48+5:30
पिंपरी-चिंचवड आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांचे अनोखे नाते होते. रिक्षा पंचायतीसह १८ संघटनांच्या माध्यमातून बाबांचे या कामगारनगरीशी घट्ट बंध होते. हमालांपासून अंगणवाडी सेविकांपर्यतच्या कष्टकऱ्यांचा आवाज बनण्याचे काम बाबांनी केले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले आहेत.

Baba Adhav Passes Away: उद्योगनगरीचा आवाज हरपला...! डॉ. बाबा आढाव यांचे निधन
पिंपरी-चिंचवड आणि कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांचे अनोखे नाते होते. रिक्षा पंचायतीसह १८ संघटनांच्या माध्यमातून बाबांचे या कामगारनगरीशी घट्ट बंध होते. हमालांपासून अंगणवाडी सेविकांपर्यतच्या कष्टकऱ्यांचा आवाज बनण्याचे काम बाबांनी केले. त्यातून अनेक कार्यकर्ते घडले आहेत.
पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचा विकास होत असताना १९९४ मध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चौकात इंदिरा गांधी ऑटो रिक्षा थांब्याचे उद्घाटन बाबा आढाव यांच्या हस्ते झाले होते. सुरुवातीला या संघटनेचे दोनशे सदस्य होते. एकतीस वर्षांत दोन हजारांहून अधिक सदस्यसंख्या झाली आहे.
बाबांमुळे रिक्षा पंचायतीसह असंघटित कामगार संघटना, कचरावेचक कामगार संघटना, पथारी संघटना, हमाल पंचायत, कागद काचवेचक संघटना, दिव्यांग संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, मोलकरीण संघटना अशा विविध संघटना उभ्या राहिल्या. रिक्षा पंचायतीचे पहिले अध्यक्ष आत्माराम नाणेकर म्हणाले, पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकाजवळच इंदिरा गांधी ऑटो रिक्षाथांबा सुरू केला होता. बाबा अत्यंत साधा माणूस. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते घडले आणि अनेक कष्टकऱ्यांना न्याय मिळाला. युती सरकारवेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे असताना पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत अनेकवेळा बैठका झाल्या. त्यावेळी बाबांना शासन पातळीवर मिळणारा सन्मान आणि दबदबा आम्ही जवळून पहिला होता. दिल्लीपर्यंत कष्टकऱ्यांचा आवाज बाबांनी पोहोचवला.
- डॉ. विश्वास मोरे
हमाल पंचायत प्रभावी
पुणे-मुंबई लोहमार्गावरील चिंचवड आणि पिंपरी ही महत्त्वाची रेल्वेस्थानके असून, तेथे हमाल पंचायतीची स्थापना बाबांनी केली होती. पिंपरी कॅम्प परिसरामध्ये हमाल पंचायतीचे कार्यालय होते. सध्या चिंचवड स्थानक येथेही पंचायतीचे कार्यालय आहे. कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये मानव कांबळे, मारुती भापकर, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार यांनी बाबांना साथ दिली होती.