वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 06:34 PM2020-10-12T18:34:14+5:302020-10-12T18:52:42+5:30

वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला.

750gram gold,and one quintal of silver seized from two criminals; Wakad police performance | वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

वाकड पोलिसांची 'धडाकेबाज' कामगिरी ; पाऊण किलो सोने आणि एक क्विंटल चांदी गुन्हेगारांकडून हस्तगत

googlenewsNext
ठळक मुद्देतीन वाहने, पिस्तुलासह एक कोटी ११ लाख ३७ हजार जप्त  ७५० ग्राम सोने, १०० किलो चांदी, तीन वाहने, १ पिस्तूल, ५ काडतुसे, कटावण्या मुद्देमाल जप्त न्यायालयाने दोघांना सुनावली १२ दिवसांची पोलीस कोठडी

पिंपरी : गंभीर गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलीे. त्यांच्याकडून पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे असा एकूण एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकडपोलिसांनी ही कामगिरी केली.

विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३१, रा. रामटेकडी, हडपसर, पुणे), विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर (वय १९, रा. पिसवली, कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत माहिती दिली. २० सप्टेंबर रोजी वाकड रोड येथे पीआर ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी निगडी येथील नवकार ज्वेलर्समधून २० किलो चांदीचे दागिने आणि २६ सप्टेंबर रोजी पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स हे दुकान फोडून पाऊण किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याबाबत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.


वाकड पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने आणि उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांची दोन पथके तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला. निगडी येथील चोरी झालेल्या सराफ दुकानापासून काही अंतरावर एक चारचाकी वाहन संशयास्पद आढळले. त्यावरून पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला असता लोणी काळभोर आणि लोणीकंद येथून दोन चारचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी खराडी, लोणीकंद, चंदननगर, वाघोली भागात शोध मोहीम सुरू केली. त्यासाठी वाकड पोलिसांनी तब्बल दहा दिवस त्या परिसरात तळ ठोकून गुन्हेगारांच्या टोळीचा शोध लावला. सराईत गुन्हेगार विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी आणि त्याची टोळी हे गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

एका चारचाकी वाहनातून आरोपी कल्याणी फिरत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून चारचाकी वाहनासह आरोपी कल्याणी आणि त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. चारचाकीची पाहणी केली असता कल्याणी याच्या वाहनामध्ये दोन लोखंडी कटावण्या, दोन कटर, सहा स्क्रू ड्रायव्हर, एक स्प्रे कॅन मिळाला. तर कल्याणी याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. त्याने वाकड रोडवरील पीआर ज्वेलर्स हे दुकान फोडल्याची कबुली दिली. त्यावरून दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपींकडून एक कोटी ११ लाख ३७ हजार रुपयांचे ७५० ग्राम सोने, १०० किलो चांदी, तीन वाहने, एक पिस्तूल, पाच काडतुसे, कटावण्या असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, जावेद पठाण, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरज सुतार, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, शाम बाबा, नितीन ढोरजे, दीपक भोसले, सचिन नरुटे, प्रमोद भांडवलकर, प्रमोद कदम, तात्या शिंदे, प्रशांत गिलबिले, नूतन कोंडे यांच्या पथकाने ही कामगिरी केलीे.

................

सातत्याने बदलायचे वास्तव्याचे ठिकाण
कल्याणी हा दरोडा, जबरी चोरी, खून यांसारख्या ४१ गंभीर गुन्ह्यात अटक होता. तसेच त्याच्यावर आणखी १५ गंभीर गुन्हे दाखल असून तो फरार होता. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो एकाच ठिकाणी जास्त दिवस वास्तव्य करीत नव्हता. सातत्याने राहण्याचे ठिकाण बदलत होता. आपण संरक्षण दलात नोकरीला आहोत, असे सांगून तो भाडेतत्वावर घर घेऊन राहात होता. तसेच तो नेहमी शस्त्र बाळगत होता. त्याने यापूर्वी पोलिसांवर देखील गोळीबार केला आहे.

...............................

विविध पोलीस ठाण्यांतील ३४ गुन्ह्यांची उकल
आरोपींनी त्यांच्या आणखी दोन साथीदारांसोबत वाकड (५ गुन्हे), चिखली (५ गुन्हे), देहूरोड (३ गुन्हे), निगडी (६ गुन्हे), पिंपरी (३ गुन्हे), चिंचवड (२ गुन्हे), सांगवी (२ गुन्हे), भोसरी (२ गुन्हे), एमआयडीसी भोसरी (२ गुन्हे), हिंजवडी (१ गुन्हा), लोणी काळभोर (१ गुन्हा), लोणीकंद (१ गुन्हा), वालीव (१ गुन्हा) या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण ३४ गुन्हे केल्याचे आरोपी यांनी पोलीस तपासात सांगितले. यात घरफोडीचे ३२ तर वाहनचोरीचे दोन गुन्हे आहेत.

......................

रेकी करून फोडायचे सराफ दुकान
आरोपी सातत्याने रहिवासाचे ठिकाण बदलून रेकी करत असत. सराफा दुकानाची पाहणी केल्यानंतर चोरीचा गुन्हा करीत. यासाठी आरोपी कल्याणी याने त्याच्या दोन मेव्हण्यांना देखील या गुन्ह्यांमध्ये सहभागी करून घेतले. आरोपी कल्याणी याच्या वडिलांनी खून प्रकरणात तुरुंगवास भोगला आहे.

Web Title: 750gram gold,and one quintal of silver seized from two criminals; Wakad police performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.