मक्लोडगंज...तिबेटी आणि ब्रिटिश संस्कृतीचा सुरेख संगम!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:56 PM2019-03-29T12:56:03+5:302019-03-29T13:02:30+5:30

काही दिवसांमध्येच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. अशातच तुम्हीही एखाद्या हटके डेस्टिनेशनच्या शोधात आहात का? काय सांगताय? परदेशात जाण्याचा विचार करताय पण बजेट नाही... टेन्शन नका घेऊ... आम्ही तुम्हाला देशातीलच एका हटके पण निसर्गरम्य अशा ठिकाणाबाबत सांगतो. जिथे जाऊन तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासोबतच वेगवेगळ्या सांस्कृतिक स्थळांबाबतही जाणून घेता येईल.

भारतातील धर्मशाळा आणि त्याच्या सौंदर्याबाबत आपल्याला माहीत आहेच. पण धर्मशाळाजवळ असचं एक हटके शहर आहे, ते म्हणजे मक्लोडगंज (Mcleodganj). हे धर्मशाळा, हिमाचल प्रदेशजवळील एक छोटसं हिल स्टेशन आहे. जे ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये फार प्रसिद्ध आहे. येथील संस्कृती आपल्याला तिबेटी आणि ब्रिटीश संस्कृतीचा विलोभनिय संगम आहे.

मक्लोडगंजला छोटासा ल्हासा असंही म्हटलं जातं आणि येथे तिबेटी अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांचं घर असल्यामुळे संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. मक्लोडगंज एक सुंदर शहर असून जे धर्मशाळेच्या वरच्या बाजूला स्थित आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या शहराच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आणि भरपूर हिरवळ आहे. येथे जास्त तिबेटी लोकांचे वास्तव्य असल्यामुळे येथे तिबेटी संस्कृती अनुभवता येते. मक्लोडगंजमध्ये अनेक निसर्गरम्य दृश्य पाहता येतात. त्यामुळे देशभरातील पर्यटकांसोबतच विदेशातील पर्यटकांनाही हे शहर आपल्याकडे आकर्षित करतं.

धर्मशाळामध्ये असलेल्या मक्लोडगंज, भागसू नाग आणि काँगडा या शहरांमधील अंतर फार कमी आहे. त्यामुळे पर्यटकांना ही तिनही शहर अगदी सोपं होतं. भारतातील अनेक धार्मिक मंदिरं जंस नामग्याल आणि सुग्लाग्खांग जिथे दलाई लामा राहतात. ती याच शहरांमध्ये आहेत. पर्यटकांनी येथे सुंदर डल नदी आणि त्रिउंड या ठिकाणांना अवश्य भेट द्यावी.

राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे मक्लोडगंजमध्ये पर्यटकांना वास्तव्य करण्यासाठी अनेक जागा उपलब्ध आहेत. येथे पर्यटकांच्या बजेटपासून महागडे हॉटेल्स आणि रिसॉर्ट राहण्यासाठी सहज उपलब्ध होतात.

येथे तुम्हाला तिबेटी संस्कृतिची छबी असणाऱ्या सुंदर कलाकृतींसोबतच ध्यानधारणा करण्यासाठी असलेली अनेक सेंटर्स पाहता येतील. ज्या लोकांना बौद्ध धर्माबाबत जाणून घ्यायचे आहे असे पर्यटक या शहराला आवर्जुन भेट देतात. याशिवाय परफेक्ट फॅमिली ट्रिपसाठी हे डेस्टिनेशन उत्तम आहे.