मकरसंक्रांत स्पेशल : मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी 'ही' ठिकाणं आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 03:53 PM2019-01-14T15:53:29+5:302019-01-14T16:15:34+5:30

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या सणाबाबत भारतामध्ये विविधता दिसून येते. लोहरी, बिहु, पोंगल अशी अनेक नावं या सणाला दिलेली आहेत.

पंजाबमध्ये 'लोहारी' या नावाने मकरसंक्रांत साजरी केली जाते. दरवर्षी संक्रातीच्या एक दिवस आधी हा सण साजरा केला जातो. लोहरीच्या संध्याकाळी सर्वजण कुटुंबीयांसह एका ठिकाणी एकत्र भेटतात. रब्बी पिकांच्या कापणीशी हा सण संबंधित असतो. आग लावली जाते तसेच आगीची पूजा केली जाते. गोड पदार्थाने एकमेकांचं तोंड गोड केलं जातं. पंजाबमध्ये नाचत-गात मोठ्या उत्साहात लोहारी हा सण साजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही हा सण साजरा करण्यासाठी पंजाबचा नक्की विचार करा.

उत्तर प्रदेश आणि त्याच्या आजुबाजूच्या परिसरात मकरसंक्रांतला 'सकरात' असं म्हटलं जातं. या पवित्र दिवशी लोक गंगेमध्ये स्नान करतात. तसेच पतंग उडवून या सणाचा आनंद लुटला जातो. यावर्षी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आले आहे. या कुंभमेळ्याला फक्त देशभरातूनच नाही तर जगभरातील भाविक भेट देत आहेत. यंदा मकरसंक्रांत साजरी करण्यासाठी उत्तर प्रदेश हे ठिकाण बेस्ट आहे.

गुजरातमध्ये 'उत्तरायण' म्हणजे मकरसंक्रांत हा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. मकरसंक्रांतीच्या दिवशी गुजरातमध्ये विविधरंगी पतंग उडवली जातात. या पतंगबाजीत अनेकांच्या पतंग उडवण्याच्या कौशल्याचा कस लागतो. तसेच गुजरातमध्ये अनेकांच्या घरात संक्रांतीच्या दिवशी उंधियो हा पदार्थ बनवला जातो. अहमदाबादमध्ये दरवर्षी इंटरनॅशनल काइट फेस्टिवलचं आयोजन केलं जातं. त्यामुळे पतंग महोत्सवाचा आनंद घ्यायचा असल्यास गुजरात उत्तम पर्याय आहे.

आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मकरसंक्रांत हा सण 'पोंगल' म्हणून साजरा केला जातो. त्यालाच भोगी पोंगल असंही म्हटलं जातं. या दिवशी घरातल्या पुरातन वस्तू काढून घरात साफसफाई केली जाते. त्याप्रमाणेच नव्या वस्तूही घेतल्या जातात. तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण तीन दिवस साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे. पोंगलच्या निमित्ताने मुरुक्कू आणि पायसम खाण्याची मजा घ्यायची असेल तर या ठिकाणी एकदा तरी जायलाचं हवं.