Xiaomi इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातही उतरली; वॉटर प्युरिफायरसह चार उत्पादने लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 09:44 AM2019-09-18T09:44:12+5:302019-09-18T09:56:56+5:30

चीनची काही काळात विक्रीची उच्च शिखरे पादाक्रांत करणारी कंपनी शाओमीने आता इलेक्ट्रॉनिक क्षेत्राकडे मोर्चा वळविला आहे. काल शाओमीने एमआयच्या 65 इंचाचा 4 के स्मार्ट टीव्ही लाँच करतानाच एमआय बँड 4, मोशन अॅक्टिव्हेटेड नाईट लाईट आणि वॉटर प्युरिफायर लाँच केला आहे.

नाईट लाईटच्या निधी जमविण्यासाठी याची विक्री आज रात्रापासून सुरू करण्यात आली असून 500 रुपयांना ही लाईट उपलब्ध आहे. हा बल्ब माणूस जसा हालचाल करेल त्या दिशेने प्रकाश फेकण्यासाठी वळतो. तर अन्य उत्पादनांची विक्री 29 सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. ही सर्व उत्पादने फ्लिपकार्टसह एमआयच्या वेबसाईटवर खरेदी करता येणार आहेत.

एमआयचा स्मार्ट टीव्ही 17999 रुपयांरपासून मिळणार आहे. तर एमआय बँडची किंमत 2299 रुपये आणि वॉटर प्युरिफायरची किंमत 11999 रुपये असणार आहे.

शाओमीने चार टीव्ही लाँच केलेत. यापैकी तीन 4के आणि एक फुल एचडी टीव्ही आहे. भारतात आतापर्यंत 30 लाख टीव्ही विकले गेले आहेत. यामधील 80 टक्के टीव्ही भारतातच बनविण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले.

कंपनीने एमआय टीव्ही 4X 65 लाँच केला आहे. यामध्ये 55 इंचाच्या टीव्हीच्या तुलनेत 40 टक्के जास्त व्ह्यू मिळणार आहे. याशिवाय कंपनीने 4X 43 इंच आणि 4X 50 इंचाचा टीव्ही लाँच केला आहे. या दोन्ही टीव्हींना 20 वॉटचा स्पीकर असणार आहे .

टीव्हीसोबतच कंपनीने साऊंडबारही लाँच केला असून त्याची किंमत 4999 रुपये आहे. त्याला टीव्ही रिमोटद्वारे नियंत्रित करता येते.

शाओमीने स्मार्ट वॉटर प्युरिफायर लाँच केला असून तो RO+UV आहे. 7 लीटरची टाकी आहे. पाणी तीन स्टेजमध्ये प्युरिफाय केले जाते. या प्युरिफायरला रिअल टाईम मॉनिटर करता येणार आहे. दोन टीडीएस सेन्सर पाणी आत येतानाचा आणि प्युरिफाय झाल्यानंतर बाहेर पडलेल्या पाण्याचा टीडीएस अॅपद्वारे दाखवितात.

शिवाय फिल्टरचे आयुष्य, किती पाणी फिल्टर केले याची माहिती मिळते. शिवाय या फिल्टरमधील कार्ट्रिज आपण बदलू शकतो. या प्रकारचा हा पहिलाच प्युरिफायर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. आणि हे काम केवळ 30 सेकंदांच करता येते.