नव्या पॉलिसीचा फटका! "या" देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी WhatsApp वर टाकला बहिष्कार; उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 09:21 AM2021-01-12T09:21:56+5:302021-01-12T09:30:22+5:30

Whatsapp New Privacy Policy : लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवा पॉलिसीमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने आणलेल्या नवा पॉलिसीमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. अनेकांनी तर या नव्या पॉलिसीचा धसका घेतला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्संना पॉपअप मेसेज पाठवला आहे. यामध्ये युजर्संना नियम व अटीसोबत नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत सांगितलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप कशा पद्धतीने तुमचा डेटा यूज करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या युजसाठी या नियम व अटीला अ‍ॅक्सेप्ट करावे लागणार आहे. जर अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर युजर्सचे अकाऊंट डिलीट केले जाईल असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या घोषणेनंतर युजर्सची चिंता वाढली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही नवी पॉलिसी आठ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैयप एर्दोगन यांच्या प्रसारमाध्यमांसंदर्भातील विभागाने राष्ट्राध्यक्ष इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची मोठी घोषणा केली आहे. तसेच तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही यापुढे आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

ब्लूमबर्गने दिलेल्या एका रिपोर्टनुसार राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी 11 जानेवारी रोजी आपले व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या BiP वर ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे तुर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अ‍ॅप आहे.

अ‍ॅपची मालकी तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या तुर्कीमधील कंपनीकडेच आहे. तुर्कीमध्ये आता या बीप अ‍ॅपवरुनच राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयासंदर्भातील सूचना दिल्या जाणार आहेत.

राष्ट्राध्यक्षांनी व्हॉट्सअ‍ॅप सोडल्याची घोषणा केल्यानंतर देशामध्ये अमेरिकन कंपनीच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपसंदर्भात आवाज उठू लागला आहे. देशातील नागरिकांनी व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन बीप जॉईन करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुर्कसेल कंपनीने रविवारी दिलेल्या माहितीनुसार 24 तासांमध्ये 10 लाखांहून अधिक नवीन युझर्सने हे मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड केलं आहे. 2013 साली लॉन्च करण्यात आलेलं हे अ‍ॅप 53 लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केलं असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे युजर्सची डोकेदुखी वाढली आहे. लोकांनी व्हॉट्सअ‍ॅपचा धसका घेतला असून त्याच्यासारखाच दुसरा पर्याय सध्या शोधत आहेत. याच दरम्यान देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था, दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने रविवारी (Confederation of All India Traders) व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून CAIT ने व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावं अशी मागणी केली आहे.

"सरकारने व्हॉट्सअ‍ॅपची नवी पॉलिसी लागू करण्यापासून रोखलं पाहिजे अथवा व्हॉट्सअ‍ॅपवरच बंदी घातली पाहिजे. व्हॉट्सअ‍ॅपचे भारतात 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. यातील प्रत्येक व्यक्तीचा पर्सनल डेटा हा अत्यंत महत्त्वाचा असून जर त्या डेटाचा गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेलाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो" असं CAIT ने आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

प्रायव्हसीला धोका नसेल आणि वापरायला ही अगदी सोपं असेल अशा अ‍ॅपचा शोध युजर्स घेत आहेत. याच दरम्यान अल्पावधीतच एका अ‍ॅपची क्रेझ वाढली आहे. सध्या सिग्नल मेसेंजर (signal massenger) ला जगभरात पसंती मिळत आहे.

गेल्या दोन दिवसांत युजर्संची संख्या ही झपाट्याने वाढल्याने सिग्नल मेसेंजरवर व्हेरिफिकेशन कोड उशिराने येत आहे. या अ‍ॅपने युजर्संला जोडण्यासाठी एक गाईडलाइन जारी केली आहे. सिग्नल पर्सनल डेटा मागत नाही तर फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. सिग्नलने डिसेंबर 2020 मध्ये आपल्या लेटेस्ट व्हर्जनसोबत एक ग्रूप कॉल लाँच केले आहे.

सिग्नल पर्सनल डेटा म्हणून फक्त तुमचा फोन नंबर स्टोर करतो. तर टेलिग्राम पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणून कॉन्टॅक्ट इन्फो, कॉन्टॅक्ट्स आणि युजर आयडी मागतो. गुरुवारी सिग्नलने ट्विट करून अनेक प्रोव्हाइडर्स कडे व्हेरिफिकेशन कोड लेट आले. कारण, नवीन लोक मेसेजिंग अ‍ॅप प्लॅटफॉर्मवर जोडण्याचा प्रयत्न करीत होते. कंपनीने एक गाईडलाइन सुद्धा शेअर केली आहे.