जाणून घ्या एका मिनिटात इंटरनेटच्या दुनियेत काय काय होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:54 PM2019-04-02T14:54:13+5:302019-04-02T15:05:28+5:30

एक मिनिट तसा फारच कमी वाटतो नाही का? पण या एका मिनिटातील ६० सेकंदात मोठ्यमोठ्या गोष्टी होतात. जरा याचाही विचार करा की, तुमच्यासारखेच किती लोक रोज इंटरनेटचा वापर करत असतील आणि जेव्हा सर्वच लोक एकत्र एखाद्या वेबसाइटचा किंवा अॅपचा वापर करत असतील तर ही संख्या किती होत असेल? एक असाच रिपोर्ट समोर आला आहे ज्यातून हे समोर आलं की, इंटरनेटवर एका मिनिटात काय काय होतं आणि किती लोक एकत्र येतात.

गुगल - जगभरात सर्वात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगल आहे. यावर २०१९ मध्ये दर मिनिटाला ३८ लाख लोक काहीना काही सर्च करत असतात. २०१८ मध्ये ही आकडेवारी दर ६० सेकंदाला ३७ लाख इतकी होती.

फेसबुक - फेसबुक तर तुम्ही वापरतच असाल! पण कधी विचार केलाय की, दर मिनिटाला किती लोक फेसबुक वापरत असतील? रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये दर मिनिटाला १० लाख लोक या सोशल नेटवर्किंग साइटवर लॉग-इन करतात. २०१८ मध्ये हा आकडा ९ लाख ७३ हजार होता.

यूट्यूब - जगातलं सर्वात मोठं ऑनलाइन व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर २०१९ दर मिनिटाला ४५ लाख व्हिडीओ बघितले जातात. तसेच या प्लॅटफॉर्मचा वापर लोक गाणी ऐकण्यासाठीही करतात. २०१८ मध्ये ही आकडेवारी ४३ लाख व्हिडीओ इतकी होती.

इन्स्टाग्राम - इन्स्टाग्राम यूजर्सची संख्या एका वर्षात फार वाढली आहे. २०१८ मध्ये या अ‍ॅपवर दर मिनिटाला अपलोड होणाऱ्या फोटोंची संख्या १ लाख ७४ हजार इतकी होती. ही संख्या २०१९ मध्ये आता ३ लाख ४७ हजार २२ झाली आहे.

ट्विटर - ट्विटरवर दर मिनिटाला ८७ हजार ५०० ट्विट केले जातात. खरंतर ट्विटरचा वापर लोक फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारखा करत नाही. पण यावर गंभीर विषय आणि बातम्या फार वेगाने येतात.

टींडर - या ऑनलाइन डेटींग अ‍ॅपवर दर मिनिटाला १४ लाख स्वाइप होतात. मग यूजरने राइट स्वाइप करो वा लेफ्ट. या स्वाइपची संख्या २०१८ मध्ये ११ लाख होती.

नेटफ्लिक्स - नेटफ्लिक्सच्या यूजरमध्येही अलिकडे मोठी वाढ झाली आहे. २०१८ मध्ये दर मिनिटाला नेटफ्लिक्सवर एकूण २ लाख ६६ हजार तास व्हिडीओ पाहिले जात होते. २०१९ मध्ये ही संख्या ६ लाख ९४ हजार ४४४ झाली आहे.

अ‍ॅपस्टोर - अ‍ॅपल अ‍ॅप आणि गुगल स्टोरवर एकूण दर मिनिटाला ३ लाख ९० हजार अ‍ॅप डाऊनलोड केले जातात. ही संख्या २०१८ मध्ये ३ लाख ७५ हजार इतकी होती. ही एका मिनिटांची आकडेवारी आहे.

ई-मेल - एका मिनिटात जगभरात १८ कोटी प्रायव्हेट आणि सामान्य ई-मेल पाठवले जातात. जीमेलसोबत आउटलूक, याहू आणि एओएल सुद्धा पॉप्युलर आहे.