Truecaller नं भारतात लाँच केली कोविड रुग्णालयांची डिरेक्टरी; जवळच्या रुग्णालयाचा क्रमांक, पत्ता मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:02 PM2021-04-29T15:02:37+5:302021-04-29T15:08:10+5:30

Truecaller नं बुधवारी भारतात एक डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल सर्विस लाँच केली आहे.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.

दरम्यान, या परिस्थितीत अनेकांनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. नागरिकांना रुग्णालयाची माहिती त्वरित मिळावी यासाठी Truecaller नं विशेष सेवा सुरू केली आहे.

Truecaller नं बुधवारी भारतात डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल डिरेक्टरी सर्विस लाँच केली आहे.

याच्या मदतीने वापरकर्ते आपल्या भागात कोविड -१९ रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे सहज शोधू शकतील.

सध्या ही सेवा Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यात रिअल-टाइम माहिती देण्यात आली आहे.

Truecaller अॅपमधून मेन्यू किंवा डायलरच्या सहाय्यानं डिरेक्टरी अॅक्सेस केली जाऊ शकते.

Truecaller चं सबस्क्रिप्शन घेतलेल्या आणि विनामूल्य सेवा वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी ही सेवा उपलब्ध आहे.

कंपनीने सर्व माहिती अधिकृत डेटाबेसमधून घेतली आहे आणि ती रिअल-टाईम आधारावर अपडेट केली जाईल, तसंच यात शक्य तितके पर्याय दाखवले जातील.

ही डिरेक्टरी केवळ शोध घेण्यासाठी आहे आणि रुग्णालयात बेड उपलब्ध होण्याची हमी देत ​​नाही असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत कंपनीला ज्या प्रकारे मदत करता येईल तशी करण्याचा प्रयत्न असल्याचं Truecaller नं सांगितलं.

भारतात सर्व लोकांना आवश्यकता असल्यास आपल्या नजीकच आरोग्य सेवा सहजरित्या मिळावी हा आपला उद्देश असल्याचं कंपनीनं म्हटलं.

तसंच जेव्हा एखाद्याला आरोग्य सेवांसंबंधित क्रमांकांची आवश्यकता असते तेव्हा त्या शोधणं कठिण असतं. यामुळे कंपनीनं हे क्रमांक या अॅपमध्ये अॅड केले आहेत, असंही कंपनीनं स्पष्ट केलं.

या डिरेक्टरीमध्ये देशभरातील विविध राज्यांमधील कोविड रुग्णालयांचे फोन नंबर आणि पत्ते आहेत.

रुग्णालयांचे क्रमांक आणि पत्ते यासंबंधी माहिती सातत्यानं अपडेट करण्यात येतील आणि भारतातील बर्‍याच भागातून अनेक रुग्णालयांचे फोन नंबर उपलब्ध असतील याची खात्री करुन घेतील, असं कंपनीनं म्हटलं आहे.

या सेवेचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून Truecaller हे अॅप डाऊनलोड करावं लागेल आणि सध्या ही सेवा केवळ अँड्रॉईड युझरसाठी उपलब्ध असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे.

Read in English