लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासासाठी 'या' आहेत काही खास टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:21 PM2018-12-22T17:21:22+5:302018-12-22T17:41:10+5:30

ऑफिस आणि घर या दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो. मात्र अनेकदा खूप काम असल्याने लॅपटॉपची बॅटरी लवकर लो होते त्यामुळे कामच्याच वेळी तो बंद होतो. पण आता काळजी करायचं काही कारण नाही कारण लॅपटॉपची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या खास टिप्सबाबत जाणून घेऊया.

लॅपटॉपला अन्य डिवाईस कनेक्ट केल्यास बॅटरी लवकर लो होते. माऊस, पेन ड्राईव्ह आणि प्रिंटरसारख्या अनेक गोष्टी कनेक्ट असल्यास बॅटरी कमी होते. त्यामुळेच ज्याचा तुम्ही वापर करत नाहीत ते डिवाईस कनेक्ट करू नका म्हणजेच बॅटरी लाईफ वाढेल.

लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी पावर सेटिंगमध्ये बदल करणं गरजेचं आहे. लॅपटॉपच्या बॅटरीसाठी पावर सेव्हिंग या पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये ब्राईटनेस आणि अन्य काही सेटिंग्स बदलून बॅटरी लाईफ वाढवता येते.

लॅपटॉपचा वापर करत असताना तापमान हे सामान्य तापमानापेक्षा अधिक असल्यास लॅपटॉप लवकर तापतो. मात्र लॅपटॉप अशाप्रकारे गरम होणं चांगलं नाही तसेच बॅटरीसाठीही ते सेफ नाही त्यामुळे लॅपटॉप उन्हात चार्ज करू नका तसेच लॅपटॉपच्या शेजारी गरम वस्तू असू नयेत.

लॅपटॉपमध्ये अनेकदा सीडी किंवा डीवीडी डिस्क असतात. मात्र त्यामुळे बॅटरी लवकर लो होते. त्यामुळेच त्याचा वापर करत नसाल तर लॅपटॉपमधून ती काढा.

लॅपटॉपमध्ये अनेक अॅप्स असतात ज्यांचा आपण वापर जास्त करत नाही मात्र हे अॅप्स आपली बॅटरी लो करत असतात. त्यामुळे Task Manager Feature च्या मदतीने हे अॅप्स बंद करा.