'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:20 IST2025-12-02T14:14:36+5:302025-12-02T14:20:04+5:30
Sanchar Saathi App benefits : 'संचार साथी' पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आता ॲपवर आल्याने नागरिकांना फ्रॉड रिपोर्ट करणे आणि सेवा वापरणे अधिक सोपे झाले आहे.

केंद्र सरकारच्या दळणवळण विभागाने स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल करणे अनिवार्य केलेल्या 'संचार साथी' ॲपमुळे आता सामान्य नागरिकांना अनेक सुविधा मिळणार आहेत. हे ॲप विशेषतः फसवणूक थांबवण्यासाठी आणि हरवलेले/चोरी झालेले मोबाईल फोन ब्लॉक करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

पुढील काही दिवसांत हे ॲप जुन्या फोन्समध्ये OTA अपडेटद्वारे, तर नवीन फोन्समध्ये प्री-इंस्टॉल्ड अवस्थेत उपलब्ध होईल. या ॲपचे ५ प्रमुख फीचर्स खालीलप्रमाणे आहेत:

तुमचा मोबाईल फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास, तुम्ही 'संचार साथी' ॲपचा वापर करून तो त्वरित ब्लॉक करू शकता. यामुळे तुमच्या फोनचा गैरवापर होणार नाही. तसेच, जर तुम्हाला तुमचा फोन परत मिळाला, तर तुम्ही तो याच ॲपद्वारे अन-ब्लॉक देखील करू शकता.

बनावट कॉल्स आणि मेसेजची तक्रार
या ॲपमध्ये 'चक्षु' सर्विस उपलब्ध आहे. याचा वापर करून, वापरकर्त्यांना आलेल्या कोणत्याही संशयास्पद कॉल्स किंवा मेसेजेस (ते WhatsApp वर असोत किंवा साधे SMS) याची तक्रार करता येते.

तुमच्या नावावर किती नंबर ॲक्टिव्ह आहेत, ते तपासा
'संचार साथी' ॲपचा सर्वात महत्त्वाचा फीचर म्हणजे तुमच्या आधार कार्ड किंवा ओळखपत्रावर किती मोबाईल नंबर ॲक्टिव्ह आहेत, याची माहिती मिळते. जर तुमच्या नावाने कोणताही अनधिकृत नंबर सुरू असेल, तर तुम्ही त्वरित त्याची तक्रार करून तो नंबर बंद करू शकता.

बनावट हँडसेटची माहिती घ्या
तुमचा फोन बनावट आहे की नाही हे तपासण्यासाठी 'संचार साथी' ॲप मदत करते. यामध्ये फक्त तुमच्या फोनचा १५ अंकी IMEI नंबर टाका. हे फीचर फोनचा ब्रँड, मॉडेल नंबर आणि निर्मितीची माहिती दाखवतो, ज्यामुळे तुम्ही बनावट फोन खरेदी करण्यापासून वाचू शकता.

परदेशी कॉल्सची तक्रार
जर तुम्हाला भारतीय मोबाईल नंबरवरून परदेशातून आलेला कॉल आल्यास, त्याची तक्रार या ॲपद्वारे करता येते. यासाठी तुम्हाला कॉलचा नंबर, वेळ आणि देशासारखे तपशील देऊन तक्रार नोंदवावी लागते.

















