मस्तच! आता घरबसल्या करू शकाल आधारकार्ड माहितीत बदल; मोबाइलवरून 'असे' करा अपडेट

By देवेश फडके | Published: January 7, 2021 09:14 PM2021-01-07T21:14:07+5:302021-01-07T21:25:16+5:30

UIDAI ने काही दिवसांपूर्वी बंद केलेली सेल्फ अपडेट सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू केली आहे. यामुळे आधारकार्डामध्ये कोणताही बदल करण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे.

सध्याच्या घडीला आधारकार्ड हे अतिशय महत्त्वाचे झाले आहे. बँकेतील व्यवहारापासून ते एखाद्या योजनेचा लाभ घेण्यापर्यंत अनेकविध ठिकाणी आधारकार्ड लागतेच. काम सरकारी असो किंवा खासगी आधार्डकार्डाशिवाय कोणतेही काम पुढेच सरकत नाही. आधारकार्डमध्ये असलेली माहिती विश्वासार्ह मानली जाते.

नवीन आधारकार्ड तयार होऊन घरी आल्यावर त्यात अनेकदा काहीतरी चुका असल्याचे आढळून येते. कधी नावातच चूक झालेली असते, तर कधी जन्मतारखेत बदल झालेला दिसतो. काहीवेळा घरचा पत्ता चुकलेला आढळून येतो, तर काहीवेळा मोबाइल क्रमांक चुकलेला दिसून येतो. अशावेळी योग्य माहिती देऊन आधारकार्ड अपडेट करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

आधारकार्डमध्ये झालेली चूक दुरुस्त करून घेण्यासाठी आधारकार्ड केंद्र, सायबर कॅफेमध्ये जावे लागते. मात्र, आता तुम्ही घर बसल्या मोबाइलमधूनही आधारकार्डामध्ये चुकलेल्या माहितीत बदल करू शकता. UIDAI ने काही दिवसांपूर्वी बंद केलेली सेल्फ अपडेट सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू केली आहे.

UIDAI कडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली सेल्फ अपडेट सर्व्हिस खूपच फायद्याची आहे. या माध्यमातून केवळ नावात झालेली चूक नाही, तर जन्मदिनांक (DOB) घरचा पत्ता (Address), मोबाइल क्रमांक यातही बदल करून शकता. आधारकार्डामध्ये कोणताही बदल करण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे.

आधारकार्डावरील माहिती अद्ययावत करण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डाशी जोडलेला असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच आधारकार्डात नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावरूनच आपल्याला ही सर्व्हिस उपलब्ध होणार आहे. यामुळे नाव, जन्मतारीख, घरचा पत्ता, मोबाइल यांसारख्या माहितीत काही मिनिटांत तुम्ही योग्य तो बदल करू शकाल.

सर्व प्रथम आधारकार्डाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या uidai.gov.in वर जावे. होमपेजवर आपल्याला MY Aadhaar हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे. यानंतर यातील Update Your Aadhaar सेक्शनमध्ये जावे. तेथे Update your Demographics Data Online याला क्लिक करावे.

Update your Demographics Data Online ला क्लिक केल्यानंतर UIDAI च्या सेल्फ सर्व्हिस पोर्टलची ऑफिशिअर वेबसाइट ssup.uidai.gov.in दिसेल. येथे आपल्याला १२ अंकी आधारकार्ड क्रमांकाने लॉन-इन करावे लागेल. आधारकार्ड क्रमांक भरल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेला कॅप्चा फिल करून Send OTP वर क्लिक करावे. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी तेथे भरावा.

यानतंर एक नवीन पेज आपल्यासमोर येईल. यामध्ये वैयक्तिक माहितीसह अन्य माहिती भरावी लागेल. यापुढे आपल्याला ज्या सेक्शनमधील माहितीत अपडेट करायचे आहे. जसे की, नाव, जन्मतारीख, घरचा पत्ता, मोबाइल क्रमांक त्या सेक्शनवर क्लिक करावे. एक गोष्ट येथे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, नावात बदल किंवा अपडेट करताना आपल्याकडे आयडी प्रुफ असणे गरजेचे आहे. आयडी प्रुफ म्हणून पॅनकार्ड, वाहन परवाना, मतदार ओळखपत्र अपलोड करावे लागेल.

या सर्व गोष्टी आणि योग्य त्या सेक्शनमधील अपडेट केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर व्हेरिफिकेशन ओटीपी येईल. तो तेथे भरावा आणि सेव्ह चेंज यावर क्लिक करावे. अशा पद्धतीने आपण आधारकार्डावरील चुकलेली माहिती घरबसल्या दुरुस्त करू शकाल.

ज्या व्यक्तींना अशा प्रकारे घरबसल्या आधारकार्डावरील चुकलेली माहिती दुरुस्त करता येणे शक्य नसेल, त्यांना आधारकार्ड केंद्रावर जावे लागेल. मात्र, तेथे जाताना आपल्या कागदपत्राची मूळ प्रत सोबत नेणे गरजेचे आहे. यासह जो मोबाइल क्रमांक नोंदवला आहे, तोही नेणे महत्त्वाचे आहे. कारण आधारकार्डामधील कोणताही बदल करण्यापूर्वी एक ओटीपी येत असतो. तो दिल्यावरच पुढील प्रक्रिया पार पाडता येते.