लय भारी! फेसबुकवर येतंय टिकटॉक सारखं नवं फीचर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 03:01 PM2020-08-18T15:01:38+5:302020-08-18T15:33:25+5:30

फेसबुकने (Facebook) अलीकडेच इंस्टाग्रामवर टिकटॉक अ‍ॅप सारखे फीचर रील्स (Reels) लाँच केले आहे. टिकटॉकला टक्कर देण्यासाठी कंपनी सतत काहीतरी नवीन प्रयत्न करीत आहे. यामध्ये आता कंपनी फेसबुकवर टिकटॉक अ‍ॅप सारख्या फीचरची टेस्टिंग करत आहे.

फेसबुकच्या मुख्य अ‍ॅपमध्ये, शॉर्ट व्हिडीओ क्लिप्स बनविणार्‍या एका फीचरचीचाचणी केली जात आहे. जी फीडमध्ये दिसून येईल. विशेष म्हणजे, हे फीचर फक्त भारतातील युजर्ससाठी असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, चिनी अॅप असलेल्या टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक हे भारतात खूप लोकप्रिय ठरले आहे. मात्र, नागरिकांच्या डेटा सुरक्षेतेच्या दृष्टीने टिकटॉकवर बंदी घातली आहे.

फेसबुकला आता भारतातील टिकटॉक युजर्स आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तम संधी मिळाली आहे. त्यामुळे कंपनी कोणत्याही परिस्थितीत ही संधी गमावू इच्छित नाही. यासाठी फेसबुकला टिकटॉकची कॉपी करण्याची गरज आहे.

फेसबुक पहिल्यांदाच आपल्या अ‍ॅपमध्ये दुसर्‍या अ‍ॅपचे फीचर देत आहे. मात्र, अलीकडेच अमेरिकेच्या खासदारांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यावर दुसर्‍या अ‍ॅपचे फीचर कॉपी करणे आणि त्यांना नष्ट करण्याचा आरोप केला आहे.

अनेक वापरकर्त्यांनी फेसबुकच्या मुख्य अ‍ॅपवर शॉर्ट व्हिडिओंचा पर्याय पाहण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू कंपनीही आपली व्याप्ती वाढवत आहे.

सोशल मीडिया एक्सपर्ट मॅट नवारा यांनी अलीकडेच ट्विटरवर रॉनेट मायकेल नावाच्या फेसबुक युजर्सचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. यामध्ये शॉर्ट व्हिडिओंचा पर्याय पाहता येईल. हे वृत्त फीडमध्येच आहे.

या फीचरच्या अंतर्गत लहान व्हिडिओंमध्ये टेक्स्ट देखील वापरला जाऊ शकतो. यासह टिकटॉक अॅपसारखे यामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक अॅड केले जाऊ शकते.

या रिपोर्टवर फेसबुकने टेक क्रंचला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनी नेहमीच नवीन क्रिएटिव्ह टूल्सची चाचणी करत असते.

शॉर्ट व्हिडिओ जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळे फेसबुक लोकांना व्हिडिओद्वारे कनेक्ट होण्याचा मार्ग देऊ इच्छित आहे.

Read in English