Alert! Mobikwik च्या १० कोटी भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सचा दावा; कंपनीनही दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 09:22 AM2021-03-31T09:22:12+5:302021-03-31T09:28:11+5:30

हॅकर समूह जॉर्डनेवन हा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. तसंच कंपनीकडून पैसे मिळाल्यानंतर हा डेटा डिलीट केला जाणार असल्याचंही म्हटलं आहे.

फिनटेक स्टार्टअप mobikwik ९.९ दशलक्ष भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. यामध्ये या लोकांचे मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि क्रेडिट कार्ड नंबर यांचा समावेश आहे.

परंतु कंपनीनं याचं खंडन केलं आहे. या डेटा हॅकिंगचा खुलासा सायबर सुरक्षा विश्लेषक राजशेखर रजहरिया यांनी केला आहे.

राजहरिया यांनी भारतीय रिझर्व्ह बँक, इंडियन कंम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम, पीसीआय मानके आणि पेमेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांनाही याबाबत लेखी स्वरूपात याची माहिती दिली आहे.

जॉर्डन डेवेन या हॅकर टीमनं वृत्तसंस्था पीटीआयला डेटाबेसची लिंकदेखील ई-मेल केली आहे. या डेटाचा वापर करण्याचा आपला हेतू नाही असंही या हॅकर समूहानं नमूद केलं आहे.

आपला हेतू केवळ कंपनीकडून पैसे घेण्याचा असल्याचं या समूहानं म्हटलं आहे. पैसे मिळाल्यानंतर हा डेटा डिलीट केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

जॉर्डवेननं मोबिक्विकचे संस्थापन बिपिन प्रीत सिंह आणि मोबिक्विकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपासान ताकू यांनादेखील या डेटाबेसचा तपशीप देण्यात आला आहे.

मोबिक्विकनं मात्र या दाव्याला नकार दिला आहे. कंपनी ग्राहकांच्या डेटाबाबत अधिक गंभीर आहे आणि सुरक्षा कायद्यांचं पूर्णपणे पालन करतं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

दरम्यान हॅकर समूहानं हा टेडा मोबिक्विकचा असल्याचा दावा केला आहे.

या ग्रुपने मोबिक्विक क्यूआर कोडची बरीच छायाचित्रे व ग्राहकांना जाणून घेण्यासाठी त्यांचे कागदपत्रे आधार आणि पॅनकार्डसह अपलोड केली आहेत.

यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचं मोबिक्विकनं स्पष्ट केलं आहे. तसंच या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता तिसऱ्या पक्षामार्फत फॉरेन्सिक डेटा सिक्युरिटी ऑडिट करणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

मोबिक्विकची सर्व खाती आणि त्यातील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंपनीनं म्हटलं.

"सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, कारण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते," अशी प्रतिक्रिया यानंतर राजहरिया यांनी दिली.

जर तुम्हाला तुमचा अकाऊंट हँक झाल्याची शंका असेल तर https://cybernews.com/personal-data-leak-check/ यावर क्लिक करावं लागेल. यावर तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून तुमची माहिती लीक झाली आहे किंवा नाही हे पाहू शकता.

जर तुमचा ईमेल आणि पासवर्ड लीक झाला असेल तर तुम्ही तो त्वरित बदलला पाहिजे.

याशिवाय बँक अकाऊंट किंवा कार्डाची माहिती लीक झाली असेल तर तुम्हाला त्वरित कार्ड ब्लॉक करून पासवर्ड बदलण्याची गरज आहे.