Apple, सॅमसंग, Xiaomi नाही, लोकांचा या स्मार्टफोन ब्रँडवर विश्वास; नाव वाचून धक्का बसेल

By देवेश फडके | Published: February 11, 2021 05:27 PM2021-02-11T17:27:46+5:302021-02-11T17:31:27+5:30

सायबर मीडिया रिसर्चकडून (CMR) करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात itel हा सर्वाधिक विश्वासार्हतेसह प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. यानंतर सॅमसंग आणि शाओमी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

बजेट स्मार्टफोनमध्ये itel कंपनीचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून येत आहे. भारतीय बाजारपेठेत अल्पावधीच itel ने तब्बल ७ कोटी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. केवळ ७ हजार रुपयांच्या बजेट स्मार्टफोनमध्ये itel हा सर्वाधिक विश्वासार्ह ब्रँड म्हणून उदयास आला आहे.

सायबर मीडिया रिसर्चकडून (CMR) करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात itel हा सर्वाधिक विश्वासार्हतेसह प्रथम क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे. यानंतर सॅमसंग आणि शाओमी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

सन २०२० मध्ये ६२ टक्के भारतीय कामासाठी स्मार्टफोनवर अवलंबून असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. तर, ५० टक्के भारतीय रिमोट वर्क तसेच ३८ टक्के लोकांनी अभ्यासासाठी स्मार्टफोनचा वापर केल्याचे या सर्वेक्षणात आढळून आल्याचे सीएमआरने सांगितले आहे.

अनेकांनी काही ना काही तरी शिकण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला. हे सर्वेक्षण मुख्यत्वे करून ७ हजार रुपयांत येणाऱ्या स्मार्टफोनच्या वापराबाबत टियर-२ आणि टियर-३ मध्ये करण्यात आले.

सीएमआरने केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, या कॅटेगरीमध्ये सर्वांत विश्वासू ब्रँड itel ठरला. तब्बल ४२ टक्के लोकांनी itel स्मार्टफोन्स आवडल्याचे सांगितले. तर, ३९ टक्के लोकांनी सॅमसंग हा विश्वासार्ह बँड असल्याचे म्हटले आहे.

प्रॉडक्ट क्वालिटी (४२ टक्के), किंमत (४४ टक्के), टेक्नोलॉजी (४२ टक्के), स्थानिक आणि नाविन्यपूर्ण विपणन (४२ टक्के), विक्रीनंतरची सर्व्हिस (४३ टक्के) या कारणांसाठी युझर्संनी itel कंपनीला पसंती दिल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

गुवाहाटी, जबलपूर, लुधियाना, मदुराई, नाशिक आणि सिलिगुडी भागातील २ हजार १२३ स्मार्टफोन्स युझर्सनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवल्याचे सीएमआरकडून सांगण्यात आले. यापैकी ५२ टक्के लोकांनी itel ला मत दिले. तर, सॅमसंग आणि शाओमीला अनुक्रमे ४८ आणि ४५ टक्के मते मिळाली.

केवळ ७ हजार रुपयांच्या स्मार्टफोनमध्ये युझर्स कॅमेरा, बॅटरी, व्यवहारिकता, स्पीड यांवर भर देतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आल्याचे सीएमआरने म्हटले आहे. तसेच यात सहभाग घेतलेल्यांपैकी ५१ टक्के युझर्सनी स्थानिक दुकानातून स्मार्टफोन्स खरेदी केला आहे.