सार्वजनिक ठिकाणी हॉटस्पॉट शेअर करणे सोडा; अनोळखी कनेक्शनमुळे तुमचा फोन होऊ शकतो हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:41 IST2025-12-02T19:29:00+5:302025-12-02T19:41:13+5:30

Hotspot Cyber Fraud: या नव्या धोक्यापासून वाचण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. तुमचा मोबाईल आणि त्यातील डेटा सुरक्षित ठेवणे ही तुमची पहिली जबाबदारी आहे.

तुम्ही एखाद्या सार्वजनिक ठिकाणी, कॅफेमध्ये किंवा स्टेशनवर असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुमच्याकडे फक्त एका मेसेजसाठी किंवा एक पेमेंट करण्यासाठी वायफाय हॉटस्पॉट मागितला तर तुम्ही त्याला लगेच मदत कराल. पण थांबा! यामुळे तुमची मोठी सायबर फसवणूक होऊ शकते.

हॉटस्पॉट शेअर करणे हा आता हॅकर्ससाठी तुमच्या स्मार्टफोनचा ताबा मिळवण्याचा एक नवीन आणि धोकादायक मार्ग बनला आहे. हॉटस्पॉट हॅकिंगच्या या नवीन पद्धतीमध्ये, सायबर गुन्हेगार तुमचा विश्वास संपादन करून तुमच्या फोनचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतात.

या फसवणुकीमध्ये हॅकर्स तुमचा विश्वास जिंकून तुमच्याकडून तुमच्या मोबाईलचा वायफाय हॉटस्पॉट मिळवतात. एकदा तुमचा हॉटस्पॉट त्यांच्या डिव्हाइसशी कनेक्ट झाला की, ते त्या कनेक्शनचा वापर करून तुमच्या फोनमध्ये किंवा त्यातील डेटापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.

अनोळखी व्यक्ती नेटवर्क काम करत नसल्याचे किंवा तातडीचे पेमेंट/मेसेज करण्याची गरज असल्याचे सांगून तुमच्याकडे हॉटस्पॉट मागते. तुम्ही हॉटस्पॉट शेअर करता आणि त्या व्यक्तीचे डिव्हाइस तुमच्या फोनच्या नेटवर्कशी जोडले जाते.

एकदा दोन्ही डिव्हाइस जोडले की, हॅकर्स प्रगत तंत्रज्ञान वापरून तुमच्या फोनमधील IMEI नंबर, IP अॅड्रेस आणि इतर सुरक्षा माहिती मिळवतात. या माहितीचा वापर करून, ते तुमच्या फोनमधील आधार कार्ड तपशील, बँकिंग अॅप्स किंवा इतर खासगी डेटा ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करतात. जर तुमच्या फोनमध्ये संवेदनशील डेटा असेल, तर तो लगेच हॅक होण्याचा धोका असतो.

सायबर तज्ज्ञांच्या मते, अनोळखी व्यक्तीला आपला मोबाईल हॉटस्पॉट देणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनोळखी व्यक्तीला मदत करण्याच्या मोहात न पडता, तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटस्पॉट शेअर करणे टाळा.

तुम्ही स्वतः देखील अनोळखी ठिकाणच्या किंवा असुरक्षित सार्वजनिक वायफाय हॉटस्पॉटशी कनेक्ट होऊ नका. एकदा तुम्ही कनेक्ट झालात की, तुमचे डिव्हाइस धोक्यात येऊ शकते.

शक्य असल्यास, बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांसाठी वापरला जाणारा मोबाईल नंबर आणि हॉटस्पॉटसाठी वापरला जाणारा नंबर वेगळा ठेवा. यामुळे डिव्हाइसवर सायबर हल्ला झाल्यास आर्थिक नुकसान टळू शकते.