CoronaVirus News : 'आरोग्य सेतू मित्र' वेबसाईट लाँच; घरबसल्या मिळणार वैद्यकीय सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:19 PM2020-05-06T16:19:10+5:302020-05-06T16:47:30+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: आरोग्य सेतू अ‍ॅपनंतर आता नीती आयोगाने 'आरोग्य सेतू मित्र'  (AarogyaSetu Mitr) ही नवी वेबसाईट लाँच केली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 49,000 वर पोहोचला आहे. तर 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले मिळत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. सरकारने 'आरोग्य सेतू' नावाचं एक नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. आरोग्य सेतू हे कॉम्प्रिहेन्सीव्ह कोविड-19 ट्रॅकिंग अ‍ॅप आहे. 

कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणे आणि सर्वसामान्यांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे हा या अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे. तसेच आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतं.

आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे शासनाकडे नोंद असलेला कोरोनाग्रस्त व्यक्तीजवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. सहा फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप ‘त्या’ व्यक्तीला ट्रॅक करू शकतं. 

आरोग्य सेतू अ‍ॅपनंतर आता नीती आयोगाने 'आरोग्य सेतू मित्र'  (AarogyaSetu Mitr) ही नवी वेबसाईट लाँच केली आहे.

नव्या वेबसाईटद्वारे घरबसल्या लोकांना डॉक्टरांचा सल्ला आणि वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. आरोग्य सेवा पुरवणे हा यामागचा उद्देश आहे. 

आरोग्य सेतू मित्रने ई-संजिवनी ओपीडी, स्वस्थ, स्टेपवन, टाटा हेल्थ आणि टेक महिंद्राच्या कनेक्टसेन्स टेलीहेल्थसोबत भागीदारी केली आहे.

वेबसाईटवरून लोकांना ऑडिओ कॉल, मेसेज, चॅट आणि व्हिडीओ कॉलवरून कोविड-19 व्हायरस संदर्भातील आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे. 

1 एमजी, डॉ. लाल पॅथलॅब्स, मेट्रोपोलीस, एसआरएल डायग्नोस्टिक्स आणि थायरोकेअर यासारख्या थर्ड पार्टी कंपन्या होम लॅब टेस्टची सुविधा देणार आहेत.

आरोग्य सेतू मित्रच्या मदतीने घरबसल्या औषधे देखील ऑर्डर करता येतात. एकंदरीत ही वेबसाईट लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आरोग्य सेतू मित्र वेबसाईट आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपवर जाऊन सुद्धा ओपन करता येऊ शकते. 

युजर्संना कन्सल्ट डॉक्टर, होम लॅब टेस्ट आणि ईफार्मसी असा पर्याय दिसतील. युजर्स आपल्या सोयीनुसार पर्याय निवडू शकतात.