Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी कर्नाटक करतंय 'या' तंत्रज्ञानाचा वापर, आरोग्य मंत्रालयाने केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 12:07 PM2020-04-15T12:07:54+5:302020-04-15T12:47:29+5:30

Coronavirus : कर्नाटकने आधीपासून कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 11,000 वर पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सर्वच राज्य कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत तर अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

कोरोनामुळे होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळण्यात भारताला यश आले आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 

तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. कर्नाटकने आधीपासून कोरोनावर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.

13 एप्रिल रोजी झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटक सरकारच्या तंत्रज्ञानाचे कौतुक करण्यात आले आहे.

कर्नाटक सरकार कोरोनावर मात करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे हे जाणून घेऊया.

कर्नाटक सरकारच्या स्पेशल टास्क फोर्सने कोरोना व्हायरस संसर्गाची लोकांना माहिती व्हावी यासाठी Corona Watch अ‍ॅप लाँच केला आहे. कोरोना वॉच अ‍ॅप एक लोकेशन ट्रॅकर अ‍ॅप आहे. 

कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांविषयी हे अलर्ट करते. तसेच या अ‍ॅपच्या माध्यमातून 14 दिवस क्वॉरंटाईन राहिलेल्या किंवा सेल्फ आयसोलेशन राहिलेल्या लोकांवर वॉच ठेवण्याचे काम केलं जात आहे.

कर्नाटकमध्ये ज्या लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्या लोकांना प्रत्येक तासाला सेल्फी अपलोड करण्यास सांगितले आहे. अ‍ॅपवर अपलोड झालेल्या सेल्फीचं मॉनिटरिंग कोरोना व्हायरस रूममधून होते.

होम क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी जर नियम पाळले नाहीत तर त्यांना रुग्णालयातील क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जाते. कोरोना वॉर रुमचे सचिव मुनीश मौदगिल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कर्नाटक सरकारकडून टेलीग्राम अ‍ॅपवर एक ग्रुप बनवण्यात आला आहे. ज्याचे नाव ‘COVID-19 Karnataka: Sahaya Group’ आहे. या ग्रुपमध्ये हजारो लोकांचा समावेश आहे. यात डॉक्टर्स आणि तज्ज्ञांना प्रश्न विचारता येऊ शकतात. 

सरकारने उत्तरं देण्यासाठी डॉक्टर्सची एक टीम बनवली आहे. या ग्रुपवर कोरोनापासून कसे संरक्षण करावे, संसर्ग कसा रोखावा, उपचाराची प्राथमिक माहिती दिली जाते. 

टास्क फोर्स मोबाईल कंपन्यांच्या मदतीने लोकेशन ट्रॅक करणे, व संसर्ग असलेल्या परिसरात जाण्यापासून लोकांना रोखणे, यासारखे काम केले जात आहे.

कोविड 19 इंडिया पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकात करोनाचा संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 247 झाली आहे. तर आतापर्यंत 59 लोक बरे झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.