Coronavirus : Zoom ची भीती वाटते?, लॉकडाऊनमध्ये 'हे' अ‍ॅप्स वापरुन घ्या Video कॉलिंगची मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:10 PM2020-04-21T15:10:21+5:302020-04-21T15:42:28+5:30

Coronavirus : झूम अ‍ॅपचा डेटा लीक झाल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण काळजीचं करू नका कारण झूम व्यतिरिक्त इतरही काही अ‍ॅप आहेत ज्याचा वापर करून व्हिडीओ कॉलची मजा घेता येते.

कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तसेच, नागरिकांना घरीच राहण्याचे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

घरबसल्या सोशल मीडियाचा वापर हा मोठ्याप्रमाणात केला जात आहे. अनेक जण नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी कॉन्फरन्स कॉल किंवा व्हिडीओ कॉलचा वापर करत आहे.

WhatsApp, TikTok ला मागे टाकत लॉकडाऊनदरम्यान 'झूम' हे अ‍ॅप नंबर वन ठरलं आहे. लॉकडाऊनमुळे ऑफिसच्या मीटिंगसाठी अनेकजण व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप असलेल्या Zoom चा वापर करत आहेत.

झूम एक फ्री एचडी मीटिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवरून युजर एकाचवेळी जास्तीत जास्त 100 लोकांसोबत बोलू शकतो. अ‍ॅपमध्ये वन-टू-वन मीटिंग आणि 40 मिनिटांची ग्रुप मीटिंग कॉलिंगची सुविधा आहे.

काही दिवसांपूर्वी झूमचे पाच लाख अकाऊंट हॅक करण्यात आल्याची आणि डार्क वेबवर कमी किंमतीत युजर्सचा खासगी डेटा विकला जात असल्याची माहिती समोर आली.

झूम अ‍ॅपचा डेटा लीक झाल्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पण काळजी करू नका कारण झूम व्यतिरिक्त इतरही काही अ‍ॅप आहेत ज्याचा वापर करून व्हिडीओ कॉलची मजा घेता येते.

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. युजर्सना कंपनीने खास व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगचे फीचर दिलं आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्हिडीओ कॉल केले जात आहेत. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं.

Google Duo मुळे व्हिडीओ कॉलची गंमत आता आणखी वाढणार असून एकाच वेळी 12 जणांशी गप्पा मारता येणार आहेत. याआधी कॉलची ही मर्यादा आठ होती.

गुगलने आपलं व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप असणाऱ्या गुगल ड्युओवर एकाच वेळेस व्हिडिओ कॉल करता येणाऱ्या युजर्सची संख्या वाढवली आहे. त्यामुळे गुगल ड्युओच्या माध्यमातून एकाच वेळी आता 12 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे.

फेसबुक मेसेंजर हे एक व्हिडीओ कॉलिंग आणि चॅटींग अ‍ॅप असून मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो.

फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून एकावेळी 8 जणांशी कनेक्ट होता येतं. तसेच अँड्रॉईड, आयओएस, वेबब्राऊजर अशा सर्व प्लॅटफॉर्मवर याचा वापर करता येतो.

फेसबुक मेसेंजरप्रमाणे स्काईप हे देखील एक जुनं व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप आहे. यामध्ये व्हिडिओ कॉलिंगसोबत मेसेज आणि फाईल ट्रान्सफर करता येतात.

अ‍ॅपल फेसटाईमच्या माध्यमातून एकाच वेळी 32 जणांना व्हिडिओ कॉल करता येतो. तसेच हे एक सुरक्षित अ‍ॅप आहे

गुगल हँगआऊट हे देखील व्हिडीओ कॉलसाठी बेस्ट अ‍ॅप असून त्यात एन्ड टू एन्ड सिक्योरिटी फीचर देण्यात आलं आहे